छत्रपती शिवरायांच्या पुतळा सुशोभीकरणाचा प्रस्ताव रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:28 IST2021-02-08T04:28:31+5:302021-02-08T04:28:31+5:30

तुळजापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या सुधारित प्रशासकीय प्रस्तावास मान्यतेसाठी पाठवून २५ दिवस झाले तरी नगरविकास खात्याने ...

The proposal to beautify the statue of Chhatrapati Shivaji stalled | छत्रपती शिवरायांच्या पुतळा सुशोभीकरणाचा प्रस्ताव रखडला

छत्रपती शिवरायांच्या पुतळा सुशोभीकरणाचा प्रस्ताव रखडला

तुळजापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या सुधारित प्रशासकीय प्रस्तावास मान्यतेसाठी पाठवून २५ दिवस झाले तरी नगरविकास खात्याने प्रस्तावास मंजुरी दिली नाही. त्यामुळे ११ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी पत्रकार परिषदेत दिला.

रविवारी नगर परिषद कार्यालयात नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरण विषयासंदर्भात पत्रकार परिषद घेतली. यावेळी नगरसेवक विजय कंदले, विनोद गंगणे, औदुंबर कदम, विशाल रोचकरी, माऊली भोसले व प्राधिकरण अभियंता प्रशांत चव्हाण उपस्थित होते. नगराध्यक्ष रोचकरी म्हणाले, २६ डिसेंबर २०१९ रोजी नगर परिषदेच्या तातडीच्या सर्वसाधारण सभेत वास्तुविशारद नेमून सुधारित प्लॅन तयार करण्यास मान्यता देण्यात आली. त्यानंतर जून व ऑगस्ट २०२० या महिन्यात वास्तुविशारद नेमून त्यांच्याकडून रेखांकन व कार्यकारी अभियंतांची मान्यता घेऊन २५ ऑगस्ट २०२० रोजी वास्तुविशारदांकडे रेखांकन सादर केले. याचदरम्यान २०२० पर्यंत सर्व विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेऊन १ सप्टेंबर २०२० रोजी सुधारित अंदाजपत्रक तयार करून ५ जानेवारी २०२१ रोजी शहर प्राधिकरण बैठकीत जिल्हाधिकारी यांच्याकडून या कामास तात्काळ मान्यता घेण्यात आली; परंतु प्रशासकीय मान्यतेच्या रकमेमध्ये तीस टक्क्यांपेक्षा जास्तीची वाढ असल्याने प्रस्ताव शासनाकडे पाठवून मान्यता घेण्याचा निर्णय झाला. त्याप्रमाणे सुधारित ७८ लाखांचा प्रस्ताव नगर विकास खात्याकडे ११ जानेवारी रोजी पाठविला असून, त्यास तात्काळ मान्यता द्यावी, अशी विनंती करण्यात आली होती.

दरम्यान, याला आता २५ दिवस उलटले तरी नगरविकास खाते व सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य यांनी मान्यता दिली नसल्याने पुतळा सुशोभीकरणाचे काम सुरू करता आले नाही; परंतु शहरातील विरोधक वस्तुस्थिती न जाणता विनाकारण नगर परिषदेवर टीका करीत आहेत. यामुळे जर १० फेब्रुवारीपर्यंत या सुशोभीकरण प्रस्तावास मान्यता मिळाली नाही, तर आपण व आपले सर्व सहकारी नगरसेवक ११ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहोत, असा इशारा रोचकरी यांनी दिला.

चौकट......

अण्णा भाऊंच्या पुतळ्यासाठी समिती

शहरातील पूर्णाकृती डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभीकरण व अण्णा भाऊ साठे पुतळा याप्रकरणी प्रश्न विचारला असता माजी नगरसेवक विनोद गंगणे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभीकरणाचा प्रस्ताव मान्यतेसाठी अंतिम टप्प्यात आला आहे, तर अण्णा भाऊ साठे पुतळ्याचे काम जागेमुळे रखडले होते; परंतु यासाठी एक समिती नेमली असून, त्यांचा अहवाल येताच याही पुतळ्यांचे काम तात्काळ सुरू केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

Web Title: The proposal to beautify the statue of Chhatrapati Shivaji stalled