उस्मानाबाद : चोरीचे गुन्हे करणाऱ्या टोळीतील एकाकडे असलेल्या मुद्देमालाची वाटणी दे म्हणून छळ केल्याने त्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शनिवारी परंडा ठाण्यात मयताच्या पत्नीसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंडा येथील रुई रस्त्यावर वास्तव्यास आलेल्या येवरड्या निवृत्ती पवार (४०) हा त्याच्या अन्य साथीदारांसह चोऱ्या करीत होता. यामध्ये त्याची पत्नी उषा पवार हीसुद्धा सहभागी असायची. दरम्यान, त्यांच्या टोळीने काही ठिकाणी चोरीचे गुन्हे केले होते. यातील परंडा तालुक्यातील काशिमबाग येथे त्यांच्या हाती मोठा मुद्देमाल लागला होता. हा मुद्देमाल येवरड्याकडेच होता. घटनेनंतर ही टोळी विखुरलेली होती. मात्र, नंतर ते एकत्र परंड्यात आल्यावर त्याचे इतर साथीदार सतीश बाबू भोसले, लखन सतीश भोसले व येवरड्याची पत्नी उषा हे तिघे जण मुद्देमालाच्या वाटणीवरून येवरड्यास त्रास देत होते. काशीमबाग येथील चोरीतील वाटणीला येणारे अडीच लाख रुपये दे, असे म्हणत या तिघांनी तगादा लावला होता. पैसे नसल्यास जागा विक मात्र पैसे पाहिजेत म्हणत त्यांनी येवरड्याचा पिच्छा केला. यापोटी त्यास सातत्याने मानसिक त्रास दिला. या त्रासातूनच येवरड्या पवार याने टोकाचे पाऊल उचलत शुक्रवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्यावर अंत्यविधी केल्यानंतर मयत येवरड्याचा भाऊ राहुल पवार याने परंडा ठाण्यात उपरोक्त तिघांविरुद्ध तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
तो एकटाच अडकला होता...
येवरड्या व त्याचे साथीदार हे विविध चोरीच्या गुन्ह्यांतील आरोपी आहेत. यातील एका चोरीच्या गुन्ह्यात येवरड्या एकटाच पोलिसांच्या जाळ्यात अडकला होता. या चोरीतील मुद्देमाल हा येवरड्याकडेच राहिला होता. अटक व नंतर पोलिसी खाक्या एकट्याने भोगायचा, वरून पोलीस मुद्देमाल जप्त करतात. हे सर्व आपल्याच वाट्याला आले तरीही मुद्देमालासाठी साथीदार छळ करीत असल्याने येवरड्याने हे पाऊल उचलल्याचे पोलिसांकडून कळाले.