आठ वर्षांपासून वीज जोडणी मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:25 IST2021-07-17T04:25:40+5:302021-07-17T04:25:40+5:30
सोनारी : येथील शेतकऱ्याने आठ वर्षांपूर्वी कृषी पंपाच्या वीज जोडणीसाठी डिमांड भरले. परंतु, अद्याप त्यांना जोडणी देण्यात आली नाही. ...

आठ वर्षांपासून वीज जोडणी मिळेना
सोनारी : येथील शेतकऱ्याने आठ वर्षांपूर्वी कृषी पंपाच्या वीज जोडणीसाठी डिमांड भरले. परंतु, अद्याप त्यांना जोडणी देण्यात आली नाही. उलट त्यांच्या नावे ३८ हजार ६४० रुपये थकीत वीज बिल दाखविण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे.
येथील तात्या नरहरी कुंभार यांनी सोनारी शिवारातील शेतातील विहिरीवर विद्युत पंप बसविण्यासाठी महावितरणकडे वीज जोडणीची मागणी केली होती. यासाठी त्यांनी १० डिसेंबर २०१३ रोजी ५ हजार ३०० रुपये डिमांड कंपनीकडे भरले. परंतु, आठ वर्ष उलटले तरी महावितरणकडून अद्याप त्यांना वीज जोडणी देण्यात आलेली नाही. उलट संबंधित शेतकऱ्याला १ हजार ३४१ युनिट वीज वापराचे ३८ हजार ६४० रुपये बिल आकारण्यात आले आहे. त्यामुळे वीज कनेक्शन नसताना बिल आकारणी झालीच कशी, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. यासंदर्भात कुंभार यांनी आठ वर्षांत पाच वेळा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारी दिल्या असून, अद्याप ना त्यांना कनेक्शन मिळाले, ना नावावरून बिलाची रक्कम कमी झाली.
चौकट...
आमचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. शेतातील विहिरीला मुबलक पाणी आहे. फक्त विद्युत कनेक्शन जोडणी नसल्यामुळे जिरायत जमीन बागायत होऊ शकत नाही. विद्युत जोडणीसाठी २०१३ मध्ये डिमांड भरले होते. परंतु, अद्याप वीज जोडणी मिळाली नाही. उलट आपल्या नावे वीज बिल काढण्यात आले आहे.
- तात्या नरहरी कुंभार, शेतकरी
हा विषय खूप जुना आहे. शेतकऱ्यांनी २०१५-१६ साली ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत संबंधित शेतकऱ्याने त्यांचा प्रश्न मांडला असता तर कदाचित त्याच वेळी तो सुटलाही असता. तरीही वरिष्ठांशी बोलून त्यांचा वीज बिलाचा प्रश्न मार्गी लावता येईल. परंतु, वीज जोडणीसाठी शेतकऱ्याला स्वत:च खांब व तारा आणून जोडणी करून घ्यावी लागेल.
- एस. जी. नायर, अभियंता, सोनारी उपकेंद्र
सध्या विद्युत जोडणीसाठी लागणारी साधनसामग्री उपलब्ध नाही. ते उपलब्ध होताच वीज जोडणी दिली जाईल. विद्युत वीज बिलदेखील दुरुस्त करण्यात येईल.
- अमय वानरे, उपविभागीय अभियंता, परंडा