माय-लेकीस चाकूचा धाक दाखवून पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 01:54 PM2019-03-31T13:54:40+5:302019-03-31T13:55:08+5:30

याप्रकरणी पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

mother-daughter looted at washi | माय-लेकीस चाकूचा धाक दाखवून पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास

माय-लेकीस चाकूचा धाक दाखवून पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास

googlenewsNext

वाशी (उस्मानाबाद ) : शिक्षिकेस व तिच्या मुलीस चाकूचा धाक दाखवत अज्ञात चोरट्यांनी रोख पाच हजार रुपये व सोन्याचे दागिने असा एकूण २ लाख ८८ हजार रूपयांचा ऐवज लुटल्याची घटना शहरात रविवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाशी येथील रहिवाशी व इंदापूर येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षिका ज्योती मुरलीधर सुकाळे यांचे पोलिस ठाण्यालगत असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ घर आहे. ३० मार्च रोजी त्या घरात वरच्या मजल्यावर झोपल्या होत्या, तर त्यांचे सासू-सासरे हे तळमजल्यावरील हॉलमध्ये झोपलेले होते. ३१ मार्च रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास त्यांना घरात कोणीतरी चालत येत असल्याचा आवाज आला. यामुळे त्या जाग्या होवून कॉटवर उठून बसल्या. यावेळी अचानक तीन इसम हातामध्ये धारधार शस्त्र घेऊ त्यांच्या जवळ आले. त्यांनी आवाज केला तर तुम्हाला जिवे मारू, अशी धमकी देत घरामध्ये जे काही आहे ते आमच्या हवाली करा, असे फर्मान सोडले. तसेच कपाटाच्या किल्लीची मागणी केली. ज्योती सुकाळे यांनी त्यांच्या मुलीस उठवून चोरट्यांना चावी देण्यास सांगितले. तसेच तुम्हाला जे न्यायचे ते न्या, मात्र आम्हाला मारू नका, अशी विनवणी केली. चोरट्यांना कपाटाची किल्ली मिळताच कपाटातील तसेच ज्योती सुकाळे व मुलगी नयना यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले.

यानंतर हे चोरटे हे हॉलचा कडी-कोयंडा पहिल्या मजल्यावरील हॉलमध्ये आल्याचे ज्योती सुकाळे यांनी पोलिसांना सांगितले. ज्योती सुकाळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिात जबरी चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला असून, घटनास्थळास पोलिस निरीक्षक सतिश चव्हाण यांनी भेट देऊन तपासाची चक्रे फिरविण्यास सुरूवात केली आहे.  या घटनमुळे शहरवासियांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.

चोरीची दुसरी घटना टळली
या घटनेनंतर चोरट्यांनी आपला मोर्चा इंदापूर रोडवरील डॉ. अमर तानवडे यांच्या घराकडे वळविला. येथे चोरट्यांनी तानवडे घरात प्रवेश केला. मात्र डॉक्टरांच्या पत्नी जाग्या झाल्यावर त्यांनी आरडाओरड केल्यामुळे चोरट्यांनी तेथून पळ काढला. त्यामुळे चोरीची ही घटना टळली. दरम्यान, तानवडे यांनी घटनेची माहिती पोलिस स्टेशनला दिल्यानंतर पोलिसही तात्काळ घटनास्थळाकडे रवाना झाले. मात्र, चोरटे पसार झाले होते.

Web Title: mother-daughter looted at washi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.