बसमध्ये मुलीचा विनयभंग; तरुणाविरुध्द गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:01 IST2021-02-06T05:01:20+5:302021-02-06T05:01:20+5:30
जिल्ह्यातील एक अल्पवयीन मुलगी ४ फेब्रुवारी रोजी एसटी बसमधून प्रवास करीत होती. यावेळी एका तरुणाने गर्दीचा फायदा घेत वाईट ...

बसमध्ये मुलीचा विनयभंग; तरुणाविरुध्द गुन्हा
जिल्ह्यातील एक अल्पवयीन मुलगी ४ फेब्रुवारी रोजी एसटी बसमधून प्रवास करीत होती. यावेळी एका तरुणाने गर्दीचा फायदा घेत वाईट हेतूने स्पर्श केला. याचा जाब तरुणीने विचारला असता तरुणाने तिला शिवीगाळ करून, धक्काबुक्की केली. बस थांबताच प्रवाशांनी त्यास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. यावरून पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून तरुणाविरुद्ध गुन्हा नोंद झाला.
भाजी मंडईतून मोबाइल चोरला
उस्मानाबाद : गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने एका व्यक्तीच्या खिशातील मोबाइल लंपास केला. ही घटना शहरातील भाजी मंडईत ४ फेब्रुवारी रोजी घडली. उस्मानाबाद येथील सलमान इकबाल पठाण हे ४ फेब्रुवारी रोजी शहरातील नेहरू चौक परिसरातील भाजी मंडईत खरेदीसाठी गेले होते. यावेळी मंडईतील गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिशातील मोबाइल चोरुन नेला. मोबाइल चोरी गेल्याचे समजातच पठाण यांनी उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.
रस्त्यात ॲटोरिक्षा केली उभी; चालकावर गुन्हा दाखल
उस्मानाबाद : वाहतुकीस अडथळा निर्माण होईल, अशा पद्धतीने रस्त्यात वाहने उभी करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांच्या वतीने कारवाई केली जात आहे. ४ फेब्रुवारी रोजी तालुक्यातील मेंढा येथील अविनाश भिसे यांनी त्यांची ॲटो रिक्षा (क्र. एमएच २५ एजे ७१११) ढोकी पेट्रोलपंप चौकात उभी केल्याचे पाेलिसांना आढळून आले. पोलिसांनी सरकारी पक्षातर्फे दिलेल्या फिर्यादीवरून भिसे यांच्यावर ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
४०४ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई
उस्मानाबाद : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४०४ वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. गुरुवारी जिल्ह्यातील विविध मार्गांवर १८ पाेलीस ठाणी व वाहतूक शाखेच्या वतीने ही कारवाई करण्यात आली. नियम मोडणाऱ्या वाहनचालकांकडून ९३ हजार १०० रुपयांचे तडजोड शुल्क वसूल करण्यात आले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर यापुढेही कारवाई सुरू राहील असे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातून सांगण्यात आले.