घाणीचे साम्राज्य, मोकाट वराहामुळे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:23 IST2021-07-18T04:23:29+5:302021-07-18T04:23:29+5:30
(फोटो : दयानंद काळुंके १७) अणदूर : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील वत्सलानगर भागात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून, ...

घाणीचे साम्राज्य, मोकाट वराहामुळे आरोग्य धोक्यात
(फोटो : दयानंद काळुंके १७)
अणदूर : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील वत्सलानगर भागात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून, मोकाट वराहामुळे रुग्णासह नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वाढलेल्या घाणीमुळे चिकनगुनियाच्या आजाराची शक्यताही बळावली आहे.
अगोदरच कोरोनाच्या महामारीमुळे जनता हतबल झाली आहे. या काळात नागरिकांना मोठ्या आर्थिक संकटाशी सामना करावा लागला. आता कुठे कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असताना अणदुरात चिकनगुनिया या साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे. गावात ठिकठिकाणी गटारी तुंबलेल्या असून, ग्रामपंचायतीकडे पुरेसे कामगार नसल्याने गटारीची साफसफाई वेळेवर होत नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी गटारीचे पाणी रस्त्यावर जात आहे. घंटागाडीच्या अनियमितपणामुळे कचरा कुंड्या भरून उकिरड्याचे स्वरूप धारण करीत आहेत. साचलेल्या केरकचऱ्याचे योग्य व्यवस्थापन नसल्याने मोकाट वराहाची गर्दी होऊन आजूबाजला घाण पसरवली जात आहे.
एकीकडे घाणीचे साम्राज्य, गटारीमधून वाहणारे घाण पाणी तर दुसरीकडे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे डासांचा प्रादुर्भावदेखील वाढला आहे. या सर्वात चिकनगुनियासारख्या आजाराने डोके वर काढले आहे. सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रासह इतर खासगी रुग्णालयातदेखील चिकनगुनिया आजाराची लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालय व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समन्वयातून चिकनगुनिया आजारासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना व जनजागृती करावी व वीज वितरण कंपनीने नियमित वीजपुरवठा करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
कोट.......
ग्रामस्थांनी चिकनगुनियासारख्या आजाराला न घाबरता, आपले घर, परिसर स्वच्छ ठेवावा. तुंबलेल्या गटारींना वाट करून निर्माण होणाऱ्या डासांचा नायनाट करावा. अनावश्यक पाणी साठवून ठेवू नये. चिकनगुनियाची कुठलीही लक्षणे आढळून येत असतील तर प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी यावे. यासंदर्भात तातडीची बैठक घेऊन उपाययोजनादेखील आखल्या जाणार आहेत.
- डॉ अक्षय जानकर, वैद्यकीय अधिकारी, अणदूर
-------------------------------------------------------