‘त्या’ वंचित शेतकऱ्यांच्या विषयावर होणार एसडीओ कार्यालयात सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:21 IST2021-07-19T04:21:46+5:302021-07-19T04:21:46+5:30

कळंब : तालुक्यातील खामसवाडी, नागझरवाडी येथील शेतकऱ्यांना गतवर्षी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या क्षेत्रांसाठी अनुदान द्यावे, यासाठी लढा उभा केलेल्या माजी ...

A hearing on the issue of 'those' deprived farmers will be held at the SDO office | ‘त्या’ वंचित शेतकऱ्यांच्या विषयावर होणार एसडीओ कार्यालयात सुनावणी

‘त्या’ वंचित शेतकऱ्यांच्या विषयावर होणार एसडीओ कार्यालयात सुनावणी

कळंब : तालुक्यातील खामसवाडी, नागझरवाडी येथील शेतकऱ्यांना गतवर्षी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या क्षेत्रांसाठी अनुदान द्यावे, यासाठी लढा उभा केलेल्या माजी पं.स. सदस्य अमोल पाटील यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने सोमवारी कळंब येथील कृषी, महसूल व पंचायत विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांची तातडीने सुनावणी ठेवण्यात आली आहे.

तालुक्यातील गतवर्षी विविध भागात पावसाने खरिपाच्या पिकावर घाला घातला होता. यात प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यानुसार काही मंडळातील, काही गावात शेतकऱ्यांना बाधित क्षेत्रासाठी अनुदान देण्यात आले होते. पावसाने खरीप हंगामातील सोयाबीन पिकांचे नुकसान झाल्याचे खामसवाडी व नागझरवाडी येथील शेतकऱ्यांनी देखील निदर्शनास आणून दिले होते. माजी पं.स. सदस्य तथा शिवसेनेचे उपतालुका प्रमुख अमोल पाटील यांनी यासंबंधी शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रशासनाचे उंबरठे झिजवले होते. मात्र, या शेतकऱ्यांना मदत मिळालेली नसल्याचे त्यांनी १ मार्च रोजी दिलेल्या तक्रारीत नमूद केले होते. यामध्ये खामसवाडी येथील ३०० तर नागझरवाडी येथील १३० शेतकरी पात्र असतानाही त्यांना अपात्र ठरवून मदत दिली नसल्याने, या शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी केली होती.

या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर

निवासी जिल्हाधिकारी यांनी कळंब येथील उपविभागीय अधिकारी यांना अमोल पाटील यांच्या तक्रारीतील मुद्यांशी निगडित चौकशी करावे, असे सूचित केले होते. दरम्यान, या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी अमोल पाटील यांचा पाठपुरावा सुरूच आहे. त्यांनी केलेल्या मागणीनुसार आता उपविभागीय अधिकारी यांनी कळंब येथे कृषी, महसूल व पंचायत विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांची सुनावणी ठेवली आहे.

यांना रहावे लागणार आहे हजर

यासाठी तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी मोहा, तलाठी खामसवाडी, खामसवाडी व नागझरवाडी येथील ग्रामसेवक, कृषी सहाय्यक व तक्रारदार अमोल पाटील यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यात कर्मचाऱ्यांना नमूद मुद्यांशी निगडित लेखी अहवालासह हजर राहण्यास उपविभागीय अधिकारी यांनी बजावले आहे.

Web Title: A hearing on the issue of 'those' deprived farmers will be held at the SDO office