उस्मानाबाद : राष्ट्रीय पशुधन अभियानअंतर्गत नावीन्यपूर्ण कुक्कुट उत्पादकता कार्यक्रमाच्या माध्यमातून मांसल पक्षी वाटप करण्यात येणार आहेत. तसेच साहित्यासाठी १०० टक्के अनुदान दिले जाणार आहे. ही कमी मानव निर्देशांक असलेल्या भूम आणि वाशी अशा दोन तालुक्यांमध्ये राबविण्यात येत आहे.
कुक्कुटपालनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील बेराेजगार तरुणांच्या हाताला काम मिळून राेजगार निर्मिती हाेऊ शकते, ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रीय पशुधन अभियानाअंतर्गत नावीन्यपूर्ण कुक्कुट उत्पादकता कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. ही याेजना कमी मानव निर्देशांक असलेल्या भूम आणि वाशी तालुक्यांतील गावांत राबविण्यात येणार आहे. यासाठी भूम तालुक्यातील सुकटा, भवानवाडी, डुक्करवाडी, पाडोळी, घाटनांदूर, रामकुंड, चांदवड, दिंडोरी, हिवरा, हांडोग्री, वाकवड, सोनगिरी, अरसोली, वंजारवाडी, देवळाली, म्हात्रेवाडी, सावरगाव (डा) व भोनगिरी; तर वाशी तालुक्यातील पारा, फक्राबाद, डोगरवाडी, सारोळा मा, मांडवा, पिंपळगाव लि., दसमेगाव, दळवेवाडी, बावी, सेलू, घोडकी, पिंपळवाडी, सारोळा वा. सोनारवाडी, पिंपळगाव को, सोनेगाव ही गावे निश्चित करण्यात आली आहेत. या याेजनेच्या माध्यमातून उपराेक्त गावांतील बेराेजगार तरुणांना राेजगार निर्मितीची संधी मिळाली आहे.
चाैकट..
प्रत्येक लाभार्थ्यास १५० पक्षी
कुक्कुट उत्पादकता कार्यक्रमांतर्गत ६०० मांसल पक्षी एका लाभार्थ्याला देण्यात येणार आहेत. हे पक्षी चार टप्प्यांत प्रत्येकी १५० याप्रमाणे देण्यात येतील. एवढेच नाही तर सहा आठवडे पुरेल एवढे खाद्य, पाणी तसेच खाद्याची भांडी, आदी घटकांसाठी १०० टक्के अनुदान दिले जाणार आहे. अनुदानाची रक्कम १ लाख १२ हजार ५०० आहे.
पाॅईंटर...
इच्छुक तरुणांना यासाठी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात अर्ज करावा लागणार आहे. यासाठी ४ ते १२ फेब्रुवारी असा कालावधी निश्चित करून दिला आहे. इच्छुकांनी तातडीने अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन आयुक्तांनी केले आहे.