वाशी : येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिल्पनिदेशक (कोपा) या पदावर कार्यरत असलेल्या डॉ.किरण प्रकाश झरकर यांचे ‘स्किल बुक’ या संगणकीय प्रणालीचे पेटंट केंद्र शासनाच्या वतीने प्रकाशित करण्यात आले. यामुळे डॉ.झरकर हे भारतातील पहिले आयटीआयचे पेटंट प्रकाशित करणारे शिल्पनिदेशक ठरले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्किल इंडिया या महत्त्वाकांक्षी योजनेला बळ देण्यासाठी डॉ.झरकर यांनी गेल्या चार वर्षांपासून स्किल बुक या अत्याधुनिक संगणकीय प्रणालीवर संशोधन केले आहे. पुण्याच्या युनिक आईपीआर सर्विसेसच्या संचालिका मधुवंती केळकर यांनी पेटंट संदर्भात त्यांना मार्गदर्शन केले. ‘स्किल बुक’ हे एक कोटी विद्यार्थी व शेतकरी यांना एक लाख कौशल्याशी जोडण्याचे डिजिटल माध्यम आहे. मोबाइल अप्लिकेशन, संगणक वेबपोर्टल व इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस या तिन्ही माध्यमांतून ते उपलब्ध होणार आहे.
हा प्रकल्प प्रकाशन स्मित किरण पब्लिशिंग प्रा.लि. या कंपनीने स्टार्टअप इंडिया या केंद्र शासनाच्या उपक्रमांतर्गत प्रकाशित केला आहे. स्किल बुक या प्रकल्पाच्या बोधचिन्हाचेही यापूर्वी प्रकाशन झाले आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून शिल्पनिदेशक डॉ.झरकर यांनी तयार केलेला हा देशातील पहिलाच प्रकल्प ठरला आहे. यावेळी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाहा, संचालक दिगांबर दळवी, सहसंचालक एस.आर. सूर्यवंशी, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी रविशंकर सावळे, प्राचार्य अवधूत जाधवर, विद्यार्थी, पालक यांनी डॉ.झरकर यांचे या उपक्रमासाठी कौतुक केले.