'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 15:54 IST2025-09-24T15:52:35+5:302025-09-24T15:54:42+5:30
‘निकष लावू नका, १०० टक्के पंचनामे करा’; मनोज जरांगे पाटील यांनी अधिकाऱ्यांना बजावले

'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
भूम (धाराशिव) : मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान झालेल्या चिंचपुर ढगे व पिंपळगाव परिसराला भेट दिली. यावेळी जरांगे यांनी शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेत त्यांना धीर दिला. सरकारने निकष न लावत जेवढे नुकसान झाले आहे. तेवढी मदत द्यावी, अन्यथा महाराष्ट्र बंद केल्याशिवाय पर्याय नाही, असा इशारा जरांगे यांनी दिला.
मदतीसाठी जनावरांचे मृतदेह लागतील अशा अव्यवहार्य अटी रद्द करून शेतकऱ्यांना तात्काळ १०० टक्के आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जरांगे यांनी केली. पिंपळगाव येथील आत्माराम दातखिळे यांना धीर देताना जरांगे यांनी नुकसानीचे पंचनामे करताना ५० टक्के ६० टक्के असे करू नका, असे आवाहन सरकारी अधिकाऱ्यांना केले. शेतमालाचे नुकसान, जनावरांचे मृत्यू, घरांचे झालेले नुकसान या साऱ्या गोष्टी गंभीर आहेत. सरकारने तत्काळ मदतकार्य सुरू करून शेतकऱ्यांना आधार देणे गरजेचे आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा करणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले.
अतिवृष्टीमुळे उभ्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल आहेत. पिकांच्या नुकसानीसोबतच जनावरांचे मृत्यू आणि घरांच्या पडझडीने अधिक वेदना झाल्याची व्यथा शेतकऱ्यांनी जरांगे जवळ व्यक्त केल्या. तसेच सरकारकडून तातडीने मदत मिळावी, ही अपेक्षा शेतकऱ्यांनी टाहो फोडत व्यक्त केली.