उस्मानाबाद : शिवभोजन थाळीसाठी दररोज रांगेत उभे राहूनही कोटा संपल्याने नागरिकांना दररोज १०० ते १५० जणांना उपाशीपोटीच परत जावे लागत असल्याचे चित्र दिसून आले.
गरीब व गरजूंना स्वस्तात भोजन मिळावे याकरिता २६ जानेवारी २०२० पासून राज्यभरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवभोजन थाळी सुरू केली आहे. जिल्ह्यात प्रथम प्रायोगिक तत्त्वावर तीन केंद्र सुरू करण्यात आले. नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहता केंद्राची संख्या वाढविण्यात आली. सध्या जिल्ह्यात केंद्राची संख्या १५ इतकी झाली आहे. कोरोनाकाळात शेतमजूर, गरजूंना थाळीचा आधार मिळत आहे. केंद्रास निश्चित केलेल्या थाळीची संख्या १५ एप्रिलपासून दीडपट वाढविण्यात आली आहे. त्यासोबतच वेळही वाढविण्यात आला आहे. सकाळी ११ दुपारी ४ वाजेपर्यंत नागरिकांना थाळी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, दुपारी २ वाजेपर्यंतच कोटा संपत असल्याने १०० ते १५० नागरिकांना रिकाम्या हाताने परवावे लागत आहे.
पॉइंटर...
जिल्ह्यातील एकूण शिवभाजन केंद्र १५
रोजच्या थाळी लाभार्थींची संख्या २२८५
शहरातील एकूण शिवभाेजन केंद्र ७
शहरातील रोज लाभार्थींची संख्या १२००
रोज १०० ते दीडशे जण उपाशी
बसस्थानक केंद्र : शहरातील मध्यवर्ती बसस्थानकातील कॅन्टिगमधील शिवभोजन थाळी केंद्रात १०० थाळीचे उद्दिष्ट आहे. १५ एप्रिलपासून इष्टांक वाढविण्यात आला त्यामुळे थाळींची संख्या १५० करण्यात आली आहे. असे असले तरी दुपारी १.३० वाजेपर्यंत थाळी संपत असल्याने दररोज १०० ते १५० व्यक्तींना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.
जिल्हा रुग्णालय परिसर केंद्र : जिल्हा रुग्णालय परिसरात शिवभाेजन केंद्र आहे. या केंद्राला १०० लाभार्थींचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. सध्या इष्टांक वाढविण्यात आला असल्याने १५० थाळ्या झाल्या आहेत. या केंद्रावरही दुपारी २ वाजेनंतर थाळी संपत आहेत.
दरोज दोन हजार २८५ जणांचे भरते पोट, बाकीच्याचे काय?
जिल्ह्यात तीन महिन्यांपूर्वी १२ शिवभोजन थाळी केंद्र होती. नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहता तीन केंद्र वाढविण्यात आली आहेत. त्यामुळे आता केंद्रांची संख्या १५ झाली आहे. या सर्वच केंद्रांवर दररोज दोन हजार २८५ जणांचे पोट भरत आहे. मात्र इतर व्यक्तींना वंचित राहावे लागत आहे.