कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 21:16 IST2025-09-28T21:15:05+5:302025-09-28T21:16:18+5:30
वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, अश्रू पुसून धाराशिवचे 'सीईओ' धावले जनतेच्या बांधावर!

कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
धाराशिव : प्रशासकीय कर्तव्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा आणि संवेदनशीलतेचा एक अलौकिक आदर्श धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मैनाक घोष यांनी घालून दिला आहे. एकीकडे, शनिवारीच त्यांच्या वडिलांवर अंत्यसंस्कारासारखे मोठे वैयक्तिक दुःख त्यांनी पचवले. तर दुसरीकडे, आपले हे दु:ख बाजूला सारून दुसऱ्याच दिवशी, रविवारी ते थेट वडगाव सिद्धेश्वर येथील जलसंकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी बांधावर (शेतावर) पोहोचले.
वडगाव सिद्धेश्वर येथील पाझर तलाव क्रमांक दोनची पाळी पाण्याच्या अतिप्रवाहामुळे वाहून गेल्याने गावकरी व शेतकरी भीतीच्या छायेखाली होते. माजी सदस्य गजेंद्र जाधव यांनी परिस्थितीचे गांभीर्य सीईओ घोष यांच्या निदर्शनास आणून दिले. वडिलांच्या निधनाच्या आघातात असतानाही, सीईओ घोष यांनी या जलसंकटाकडे जराही दुर्लक्ष केले नाही. त्यांनी त्वरित स्वतः घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीची पाहणी केली. या ठिकाणी त्यांनी जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यास तातडीने सांडव्याची खोली वाढवून पाण्याचा प्रवाह सुरक्षितपणे काढून देण्याचे कठोर आदेश दिले. ते एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर पडत्या पावसात अर्धा ते पाऊण तास थांबून जेसीबीच्या सहाय्याने तलाव धोकामुक्त केला. यावेळी गावचे युवा नेते अंकुश मोरे यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, एका बाजूला कुटुंबावरील आघात आणि दुसऱ्या बाजूला जनतेची चिंता; या दोन्ही जबाबदाऱ्यांचे उत्कृष्ट संतुलन राखणाऱ्या मैनाक घोष यांच्या या कर्तव्यनिष्ठेमुळे वडगाव सिद्धेश्वर येथील मोठे जलसंकट टळले आहे. त्यांच्या या संवेदनशील कृतीबद्दल आणि बांधिलकीबद्दल संपूर्ण परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.