धाराशिवमध्ये सहा मंडळात पुन्हा अतिवृष्टी; नदी-नाले दुथडी, उरली-सुरली पिकेही वाहून नेली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 13:29 IST2025-10-06T13:27:15+5:302025-10-06T13:29:27+5:30
विक्रमी पावसामुळे अनेक भागांत पुन्हा पूरपरिस्थिती निर्माण झाली होती.

धाराशिवमध्ये सहा मंडळात पुन्हा अतिवृष्टी; नदी-नाले दुथडी, उरली-सुरली पिकेही वाहून नेली
धाराशिव : दोन दिवसांच्या उघडीपीनंतर शनिवारी रात्री आणि रविवारी पहाटेच्या सुमारास जिल्ह्यातील सहा मंडळांमध्ये पुन्हा अतिवृष्टी झाली आहे. धो-धो कोसळलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले दुथडी भरून वाहिले, परिणामी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. उरली-सुरली पिकेही या पावसाच्या पाण्याने वाहून नेली.
शनिवारी दिवसभर उन्ह होते. मात्र, रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली आणि तो रविवारी सकाळी सात वाजेपर्यंत संततधार सुरू होता. या विक्रमी पावसामुळे अनेक भागांत पुन्हा पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका कळंब तालुक्याला बसला आहे. सहापैकी चार मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे, तर उर्वरित दोन मंडळांतही प्रत्येकी ४५ मिमी पेक्षा अधिक पाऊस झाला. यामध्ये ईटकूर (७३.५ मिमी), मोहा (७४.५ मिमी), शिराढोण (७७.५ मिमी) आणि गोविंदपूर (७७.५ मिमी) या कळंब तालुक्यातील मंडळांचा समावेश आहे. भूम तालुक्यातील ईट सर्कलमध्ये ६७ मिमी तर वाशी मंडळामध्ये ६८ मिमी पाऊस नोंदविला गेला आहे. याशिवाय कळंब, येरमाळा आणि तेरखेडा या तीन मंडळात प्रत्येकी ४० ते ४५ मिमी पेक्षा अधिक पाऊस कोसळला.
या पावसामुळे त्या-त्या भागातील लहान-मोठे नदी, नाले दुथडी भरून वाहत होते. विशेषतः कळंबमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. अतिवृष्टीच्या या तडाख्यात खरिपाची उरली-सुरली पिकेही उद्ध्वस्त झाली आहेत. प्रचंड प्रमाणात झालेल्या या नुकसानीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. शासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.