Dharashiv: कळंब तालुक्यात पावसाचे पुन्हा थैमान; पुरात वाहून गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 15:26 IST2025-10-06T15:25:53+5:302025-10-06T15:26:39+5:30
पाणी वेगाने वाहत असल्यामुळे खोली आणि वेगाचा अंदाज न आल्याने शेतकरी वाहून गेला

Dharashiv: कळंब तालुक्यात पावसाचे पुन्हा थैमान; पुरात वाहून गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू
शिराढोण (जि. धाराशिव) : कळंब तालुक्यात पावसाने पुन्हा एकदा थैमान घातल्यामुळे नद्या आणि ओढे प्रचंड वेगाने वाहत आहेत. यामध्ये जीवितहानीही समोर येऊ लागली आहे. रविवारी सकाळी दुधासाठी शेताकडे गेलेले पाडोळी येथील शेतकरी विजयकुमार सत्यनारायण जोशी (५१) यांचा निपाणी-पाडोळी ओढ्याच्या पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे.
रविवारी सकाळी ६ वाजता पाडोळी (ना.) येथील शेतकरी विजयकुमार सत्यनारायण जोशी हे नेहमीप्रमाणे दूध आणण्यासाठी आणि जनावरांना चारा देण्यासाठी शेताकडे गेले होते. जाताना पुलावरून थोडे पाणी असल्याने दुचाकी अलीकडेच लावून ते शेतात गेले. मात्र, परत येत असताना निपाणी–पाडोळी पुलावरील पाण्याची पातळी वाढली होती. पाणी वेगाने वाहत असल्यामुळे खोली आणि वेगाचा अंदाज त्यांना आला नाही. त्यामुळे प्रवाहात वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला.
काही अंतरावरून नागरिकांना त्यांचा मृतदेह बाहेर काढला. मयत विजयकुमार जोशी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुरुड येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. सोमवारी सकाळी आठ वाजता मुरुड येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.