Dharashiv: पोटासाठी शेकडो मैल आले, पण नियतीने घात केला! दोघांचा तलावात बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 19:27 IST2025-10-08T19:25:15+5:302025-10-08T19:27:13+5:30
साठवण तलावाच्या पाण्यात अंघोळीसाठी उतरलेल्यानंतर घडली दुर्घटना!

Dharashiv: पोटासाठी शेकडो मैल आले, पण नियतीने घात केला! दोघांचा तलावात बुडून मृत्यू
तामलवाडी (जि. धाराशिव) : पोटाची खळगी भरण्यासाठी शेकडो मैलांचा प्रवास करून आलेले आणि तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी शिवारात कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन प्रकल्पाच्या कामावर राबणारे दोन तरुण मजूर काळाच्या एका क्रूर थपडीने हिरावले गेले. साठवण तलावाच्या पाण्यात अंघोळीसाठी उतरलेल्या या परप्रांतीय बांधवांना पाण्याचा अंदाज न आल्याने जागीच बुडून हृदयद्रावक मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी दहा वाजता घडली.
पांगरदरवाडी शिवारातील साठवण तलावावर उपसा सिंचन योजनेचे काम सुरू आहे. या कामावर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यांतील मजूर एका ठेकेदाराच्या मार्फत काम करताहेत. बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दोन मजूर अंघोळीसाठी तलावात उतरले. मात्र, तलावातील खोल पाण्याचा त्यांना अंदाज न आल्याने ते बुडू लागले असता, 'वाचवा! वाचवा!' असा त्यांचा आर्त टाहो येथील कामगारांनी ऐकला आणि ते पाण्याकडे धावले, पण तोवर नियतीने त्यांचा घास घेतला होता. यातील अखिलेश दयाशंकर गुप्ता (वय ३४, मूळ रा. उत्तर प्रदेश) यांचा मृतदेह तातडीने मिळून आला. मात्र, दुसऱ्या मजुराचा मृतदेह शोधणे हे एक मोठे आव्हान होते. जवळपास तीन तासांच्या अथक शोधानंतर राजेश विश्वकर्मा (३५, मूळ रा. मध्य प्रदेश) यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले. घटनास्थळी तामलवाडी पोलिस ठाण्याचे सपोनि गोकुळ ठाकूर यांच्यासह पथकाने धाव घेतली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
अन् तळाला गेलेला मृतदेह पाण्याबाहेर काढला...
पाण्याचा अंदाज न येऊन बेपत्ता झालेल्या दुसऱ्या मजुराचा मृतदेह शोधण्यासाठी पाेलिस उपनिरीक्षक जुबेर काझी यांनी स्थानिक तरुण अमोल मारडकर आणि कार्तिक पुरी यांच्या साथीने स्वतः तलावाच्या पाण्यात उडी घेतली आणि तळाला गेलेला मृतदेह शोधून बाहेर काढण्यात पोलिसांना यश मिळाले.