लग्नाआधीच सरण रचलं गेलं! देवदर्शन घेऊन परतताना भावी पती-पत्नीला काळाने गाठलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 13:49 IST2026-01-05T13:45:18+5:302026-01-05T13:49:51+5:30
कुलदैवताचे दर्शन ठरले शेवटचे; खंडोबाच्या दर्शनाहून परतताना काळाची झडप

लग्नाआधीच सरण रचलं गेलं! देवदर्शन घेऊन परतताना भावी पती-पत्नीला काळाने गाठलं!
जेवळी (जि. धाराशिव) : मे महिन्यात ज्यांच्या लग्नाची सनई वाजणार होती, त्या भावी पती-पत्नीवर काळाने झडप घातली आहे. नळदुर्गच्या खंडोबाचे दर्शन घेऊन परतताना झालेल्या भीषण अपघातात जेवळी पूर्व तांडा येथील बबन पवार आणि रोहिणी राठोड या जोडप्याचा अंत झाला. महामार्गावरील अर्धवट कामामुळे दोन सुखी संसारांची स्वप्ने क्षणात महामार्गावर विखुरली गेली आहेत.
बबन गोपा पवार (वय २६) हे मुंबईत फार्मासिस्ट म्हणून कार्यरत होते. सहा महिन्यांपूर्वीच त्याचा रोहिणी बाबू राठोड (२२) यांच्याशी साखरपुडा झाला होता. घराचे बांधकाम सुरू असल्याने मे महिन्यात विवाह सोहळा पार पडणार होता. "कारखाना पट्टा पडला की मे महिन्यात लग्न करू," असे नियोजन दोन्ही कुटुंबांनी केले होते. लग्नाच्या याच आनंदात दोघेही रविवारी दुपारी नळदुर्गच्या खंडोबाचे दर्शन घेऊन घराकडे निघाले होते. दुपारी दोनच्या सुमारास दस्तापूर गावाजवळ मागून येणाऱ्या एका भरधाव टँकरने (एम.एच. ४२-एक्यू ६७९६) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकी ३० फूट फरफटत रस्त्याच्या कडेला जाऊन पडली. या अपघातात बबनचा जागीच मृत्यू झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रोहिणीला मदतीसाठी श्यामसुंदर तोरकडे, अल्ताफ पटेल, अर्जुन दंडगुले व सहकाऱ्यांनी तातडीने जळकोट येथील रुग्णालयात हलवले, मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.
तांड्यावर शोककळा
ज्या घरात लग्नाची लगबग सुरू व्हायची, तिथे आता फक्त हुंदके आणि करुण आकांत ऐकू येत आहे. हळदीच्या आधीच या दोघांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आल्याने जेवळी पूर्व तांडा परिसरातील नागरिकांचे डोळे पाणावले.
प्रशासनाच्या दिरंगाईने घेतला बळी?
महामार्ग क्रमांक ६५ वर दस्तापूरजवळ डिव्हायडरसाठी जागा सोडण्यात आली आहे, मात्र हे काम कित्येक दिवसांपासून अर्धवट आहे. तिथे ना डिव्हायडर आहे, ना धोक्याचा कोणताही सूचना फलक. याच अर्धवट कामामुळे आणि नियोजनाच्या अभावामुळे हा अपघात झाल्याचा संताप ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. महामार्ग प्राधिकरणाच्या या दुर्लक्षामुळे दोन उमद्या तरुणांचे प्राण गेले असून, "आणखी किती बळी घेतल्यावर प्रशासनाला जाग येईल?" असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.