खासदारांच्या मध्यस्थीनंतर पाणंद रस्त्याचा प्रश्न मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:30 IST2021-02-07T04:30:12+5:302021-02-07T04:30:12+5:30

(फोटो : बसवराज होनाजे ०६) जेवळी : लोहारा तालुक्यातील दस्तापूर येथील गेल्या २५ वर्षांपासून प्रलंबित असलेला पाणंद रस्त्याचा प्रश्न ...

After the mediation of the MPs, the issue of Panand road was resolved | खासदारांच्या मध्यस्थीनंतर पाणंद रस्त्याचा प्रश्न मार्गी

खासदारांच्या मध्यस्थीनंतर पाणंद रस्त्याचा प्रश्न मार्गी

(फोटो : बसवराज होनाजे ०६)

जेवळी : लोहारा तालुक्यातील दस्तापूर येथील गेल्या २५ वर्षांपासून प्रलंबित असलेला पाणंद रस्त्याचा प्रश्न अखेर खा. ओम राजेनिंबाळकर यांनी मध्यस्थी केल्याने मार्गी लागला. यामुळे दोन गावांच्या पन्नासपेक्षा जास्त शेतकऱ्यांची शेतरस्त्याअभावी होणारी हेळसांड आता थांबणार आहे.

दस्तापूर हे गाव राष्ट्रीय महामार्गावर वसलेले आहे. या गावापासून तीन किमी अंतरापर्यंत भोसगा या गावाच्या शेतशिवारात जाण्यासाठी पूर्वीचा पाणंद रस्ता होता. मात्र, दोन्ही बाजूंनी शेतकऱ्यांनी हा रस्ता बंद केला होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना शेताकडे जाण्यासाठी दूरचा प्रवास करावा लागत होता. हा पाणंद रस्ता तयार करून शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी या रस्त्यावर असलेले शेतकरी मागील २५ वर्षांपासून पाठपुरावा करीत होते. मात्र, त्यांना यश आले नव्हते.

दरम्यान, खा. ओम राजेनिंबाळकर यांच्यामार्फत जनसंपर्क प्रमुख वैजीनाथ पाटील यांनी याकामी पुढाकार घेत दोन्ही बाजूला असलेल्या शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. शिवाय, काही शेतकऱ्यांना खा. राजेनिंबाळकर यांनी फोनवरून समजावले. त्यामुळे पाणंद रस्ता करण्यासाठी शेतकऱ्यांनी परवानगी दिली. यावेळी लोहारा तहसीलदार संतोष रूईकर, मंडळ अधिकारी एम.एस. स्वामी, तलाठी सुरेश करात, वैजीनाथ पाटील, नूतन ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ पाटील, अलताफ पटेल, सर्जेराव पाटील, पोलीस पाटील सुधाकर गायकवाड, बंडप्पा कोकाटे, धोंडीराम सूर्यवंशी, त्र्यंबक कोकाटे, लक्ष्मण कालाप्पा, प्रशांत चव्हाण, भास्कर कोकाटे, धोंडीराम गडदे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

फोटो : दस्तापूर येथील पाणंद रस्ता कामाची सुरुवात करताना तहसीलदार संतोष रूईकर, एम.एस. स्वामी, सोमनाथ पाटील, वैजीनाथ पाटील आदी.

Web Title: After the mediation of the MPs, the issue of Panand road was resolved