तुळजापूर : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा पदार्थ विक्री करणाऱ्या तुळजापूर शहरातील ६ पान टपरी चालकांवर अन्न व औषध प्रशासन पथकाने कार्यवाही करून ९ हजार ५०२ रुपयांचा माल जप्त केला, तसेच न्यायालयाचा पुढील आदेश येईपर्यत या पानटपऱ्या सील करण्यात आल्या आहेत.
तुळजापूर शहरातील पंचायत समिती कार्यालय समोर, बस स्थानकासमोर समोर, पोलीस ठाण्यासमोरील पानटपऱ्यांची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान तुळजापूर शहरातील सहा पानटपरीधारकांकडे तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. यावेळी पंचायत समिती कार्यालयासमोरील सौदागर पान शॉपमधून १ हजार २९० रुपये, बस स्टँडसमोरील जगदंबा पान शॉप येथून ४ हजार ६५० रुपये, खुंटाफळे पान स्टॉल २८० रुपये, गणेश पान शॉप १ हजार ७७० रुपये, तर यश पान शॉप येथून २४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, तसेच सदरील सहाही पानटपऱ्या न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत सील करण्यात आल्या आहेत.
याशिवाय पान शॉप व्यावसायिकांवर ३२८ प्रमाणे पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून, त्यांना पोलिसांच्या ताब्यातही देण्यात आले आहे.
ही कारवाई सहायक आयुक्त कोडगिरे व विभागीय सहायक आयुक्त वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी प्रमोदकुमार काकडे यांनी केली. त्यांना सहायक म्हणून तुकाराम अकोसकर, नाना गाढवे, बालाजी शेंडगे यांनी मदत केली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने केलेल्या या कारवाईमुळे पानटपरीधारकांचे धाबे दणाणले असून, काही पान शॉप व्यावसायिकांनी तर कारवाई टाळण्यासाठी स्वतःच टपऱ्या बंद ठेवल्या आहेत.