उमरग्यातील ४३ शाळा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:23 IST2021-07-16T04:23:31+5:302021-07-16T04:23:31+5:30
उमरगा : कोविडमुक्त क्षेत्रातील ग्रामपंचायती, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ठरावांनी कोविड निकषांच्या आधारे पहिल्या टप्प्यात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू ...

उमरग्यातील ४३ शाळा सुरू
उमरगा : कोविडमुक्त क्षेत्रातील ग्रामपंचायती, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ठरावांनी कोविड निकषांच्या आधारे पहिल्या टप्प्यात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास शिक्षण विभागाने मंजुरी दिली आहे. यानुसार गुरुवारी तालुक्यातील ४३ शाळांमध्ये वर्ग भरविण्यात आले असून, पहिल्या दिवशी १ हजार ८२६ विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली.
ज्या आठवी ते बारावी वर्ग सुरू करायचे आहेत, तेथे किमान महिनाभर आधीपासून एकही कोविड रुग्ण नसावा. शिवाय, ग्रामपंचायत स्तरावर सरपंचाच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करून निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सोबतच, शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षकांच्या लसीकरणाला प्राधान्य देऊन जिल्हाधिकारी यांनी नियोजन करावे, असेसुद्धा शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. शाळा सुरू करत असताना मुलांना टप्प्याटप्प्याने शाळेत बोलवण्यात यावे, केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या आरोग्य सूचनांचे पालन करून वर्ग घेण्यात यावे, अश्या सूचना देण्यात आल्या आहेत.
यानुसार तालुक्यातील ८ वी ते १२ वी वर्गाच्या १०२ शाळांपैकी ४३ शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये १ हजार ८२६ विद्यार्थी तर ३९९ शिक्षकांची उपस्थिती होती. किमान एक लस घेतलेल्या शिक्षकांची संख्या ३२४ आहे. गावात कोरोना रुग्ण असलेल्या व शहरी भागातील शाळा बंद होत्या, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार यांनी दिली.