'तू इथेच थांब, मी आलेच...'; सख्ख्या भावाच्या हातावर तुरी देऊन बहिणीच्याच नवऱ्यासोबत पळून गेली तरुणी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 13:57 IST2025-10-06T13:52:36+5:302025-10-06T13:57:05+5:30
पत्नीची बहीण ही प्रत्येक पुरुषासाठी त्याच्या लहान बहिणीसमान असते. मात्र, असे काही लोक आहेत, जे या पवित्र नात्याला काळीमा फासतात.

AI Generated Image
पत्नीची बहीण ही प्रत्येक पुरुषासाठी त्याच्या लहान बहिणीसमान असते. मात्र, असे काही लोक आहेत, जे या पवित्र नात्याला काळीमा फासतात. उत्तर प्रदेशच्या गोंडा जिल्ह्यातून अशीच एक घटना समोर आली आहे. या भागात राहणारी एक तरुणी आपल्याच बहिणीच्या पतीसोबत प्रेमप्रकरण करून घरातून पळून गेली. विशेष म्हणजे पळून जाताना तिने भावाला देखील फसवले. भावासोबत बाहेर जाण्याचा बहाणा करून घरातून निघालेली ही तरुण रस्त्याच्या मध्यातच उतरून बहाणा करून, भावाच्या हातावर तुरी देऊन पळून गेली.
प्रेमप्रकरण आणि पळून जाण्यासाठी तिने आपल्या बहिणीच्याच पतीचा आधार घेतला. या घटनेमुळे पीडित तरुणीचे कुटुंबीय आणि संपूर्ण परिसर हादरला आहे. तरुणीच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून नगर कोतवाली पोलिसांनी बहिणीच्या पतीवर गुन्हा दाखल केला असून, दोघांचाही कसून शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
दुकानतून सामान घेते सांगून झाली फरार
हा प्रकार खरगूपुर पोलीस स्टेशन क्षेत्राशी संबंधित आहे. तरुणीच्या भावाने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत घटनेची माहिती दिली आहे. त्याने सांगितले की, 'गेल्या वर्षी ३० नोव्हेंबर २०२४ रोजी मी माझ्या बहिणीला घेऊन लुधियानाहून गोंडा येथे आलो होतो.'
शनिवारी दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास दोघेही शहराच्या रेल्वे स्टेशनवरून जय नारायण चौकाकडे जात असताना ही घटना घडली. तरुणी एका दुकानतून काही सामान घेण्याच्या बहाण्याने थांबली. तिने भावाला 'तू इथेच थांब, मी लगेच येते' असे सांगितले.
पळवून नेल्याचा भावोजीवर आरोप
भावाने पोलिसांना सांगितले की, "मी थांबलेलो असताना, त्याचवेळी माझ्या दुसऱ्या बहिणीचा नवरा, म्हणजे माझा भावोजी तिथे आला आणि त्याने माझ्या बहिणीला फूस लावून आपल्यासोबत घेऊन पळवून घेऊन गेला."
पळून जाताना या दोघांनीही आपले मोबाईल फोन बंद केले, ज्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधणं शक्य झालं नाही. या घटनेनंतर कुटुंबीयांनी तरुणीचा खूप शोध घेतला, पण तिचा कोणताही ठावठिकाणा न लागल्याने अखेरीस तिच्या भावाने पोलिसांत तक्रार दाखल केली.
पोलिसांकडून दोघांचा शोध सुरू
नगर कोतवाली पोलिसांनी तक्रारीच्या आधारावर भावोजीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तपासाला सुरुवात केली आहे. पोलिसांनी सांगितले की, "प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष पथक तयार करण्यात आले आहे. मोबाईल लोकेशन आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारावर दोघांचाही शोध सुरू आहे. लवकरच तरुणीला शोधून काढले जाईल." या घटनेमुळे गोंडा शहरात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. कुटुंबीयांनी पोलिसांना तातडीने कारवाई करण्याची विनंती केली आहे.