गर्भवती सुनेला घेऊन सासू रुग्णालयात गेली; पण दुसऱ्या दिवशी लिफ्टमध्ये आढळला मृतदेह!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 14:10 IST2024-01-25T13:46:02+5:302024-01-25T14:10:47+5:30
मागील दोन दिवसांपासून आम्ही सीसीटीव्ही फुटेज मागूनही रुग्णालयाने ते आम्हाला उपलब्ध केलं नसल्याचं सांगत मृत महिलेच्या कुटुंबीयांना रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरलं आहे.

गर्भवती सुनेला घेऊन सासू रुग्णालयात गेली; पण दुसऱ्या दिवशी लिफ्टमध्ये आढळला मृतदेह!
आपल्या गर्भवती सुनेला घेऊन रुग्णालयात गेलेल्या सासूचा दोन दिवसांनंतर लिफ्टमध्ये मृतदेह आढळून आला आहे. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील बलियामधील एका नर्सिंग होममध्ये घडली आहे. दोन दिवसांपासून सदर महिलेचा शोध घेतला जात होता. मात्र ती मृतावस्थेत आढळून आल्यानंतर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव मुन्नी देवी (वय- ५५ वर्ष) असं असून ती ककरी या गावातील रहिवासी होती. २३ जानेवारीपासून ती गायब होती. त्यानंतर कुटुंबीयांनी मुन्नी देवी गायब असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली होती. तेव्हापासून पोलिसांकडून शोध सुरू होता. बुधवारी रात्री उशिरा महिलेचा मृतदेह लिफ्टमध्ये आढळून आला. त्यानंतर पोलिसांकडून मुन्नी देवी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.
दरम्यान, पोलिसांकडून सध्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि रुग्णालयातील लोकांची चौकशी करत या प्रकरणातील गूढ उकलण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र मागील दोन दिवसांपासून आम्ही सीसीटीव्ही फुटेज मागूनही रुग्णालयाने ते आम्हाला उपलब्ध केलं नसल्याचं सांगत मृत महिलेच्या कुटुंबीयांना रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरलं आहे. सुनेला रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या महिलेचा रुग्णालयातच मृत्यू झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.