बँकेपासून फिल्डिंग, दुकानात हातसफाई;आईने ५ वर्षांच्या मुलाला पुढे करून लांबवले ४४ हजार, CCTVमुळे फुटलं भांडं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 11:28 IST2026-03-25T11:27:48+5:302026-03-25T11:28:18+5:30

वाशिममध्ये मुलाला पुढे करुन चोरी करणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे.

Woman who committed theft in Washim by using her child as a front has been arrested | बँकेपासून फिल्डिंग, दुकानात हातसफाई;आईने ५ वर्षांच्या मुलाला पुढे करून लांबवले ४४ हजार, CCTVमुळे फुटलं भांडं

बँकेपासून फिल्डिंग, दुकानात हातसफाई;आईने ५ वर्षांच्या मुलाला पुढे करून लांबवले ४४ हजार, CCTVमुळे फुटलं भांडं

Washim Crime: मुलाला गुन्हेगारीच्या जगात ढकलून, त्याच्या निरागसतेचा वापर करत चोरी करणाऱ्या एका निर्दयी आईला अटक करण्यात आली आहे. वाशिम स्थानिक गुन्हे शाखेने मानोरा येथील एका कापड दुकानात भरदिवसा चोरी करणाऱ्या रोहिणी उर्फ शीतल भास्कर शिंदे या महिलेला बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक म्हणजे, ही महिला स्वतःच्या ५ वर्षांच्या मुलाला चोरीचे ट्रेनिंग देऊन त्याच्याकडून हातसफाई करून घेत असल्याचे तपासात समोर आले आहे.

बँकेपासून दुकानापर्यंत फिल्डिंग

२३ मार्च रोजी मानोरा येथील रहिवासी सुरेखा लिंबोळे या बँकेतून ४४ हजार रुपये काढून एका कापड दुकानात खरेदीसाठी गेल्या होत्या. आरोपी रोहिणी ही बँकेपासूनच सुरेखा यांच्यावर पाळत ठेवून होती. दुकानात गर्दी असताना, रोहिणीने आपल्या मुलाला हळूच खुणावले. ग्राहक कपडे पाहण्यात मग्न असताना, या चिमुरड्याने आईच्या इशाऱ्यावरून सुरेखा यांच्या बॅगेतील ४४ हजार रुपये आणि मोबाईल असलेली पर्स अत्यंत शिताफीने लंपास केली. ही संपूर्ण थरारक घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

तपासाचे चक्र फिरले अन्...

चोरी झाल्याचे लक्षात येताच मानोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित महिला तिच्या मुलासह वाशिमच्या दिशेने जात असल्याचे दिसले. पोलिसांनी गुप्त बातमीदारांद्वारे वाशिममधील सिव्हिल लाईन परिसरातून या महिलेला ताब्यात घेतले.

अशी होती चोरीची 'मोडस ऑपरेंडी'

तपासादरम्यान पोलीसही चक्रावून गेले. ही महिला गर्दीच्या ठिकाणी किंवा बाजारपेठेत लहान मुलाला पुढे करायची. लोक मुलाच्या खोडकर किंवा निरागस हालचालींकडे बघण्यात गुंतले की, ही महिला चोरी करायची किंवा मुलाकडून करून घ्यायची. स्वतःवर कोणाला संशय येऊ नये म्हणून ही मुलाचा वापर करत असे.

पोलिसांची कारवाई

महिला पोलीस अंमलदारांच्या मदतीने रोहिणीची झडती घेतली असता, तिच्याकडे चोरीचे संपूर्ण ४४ हजार रुपये आणि मोबाईल मिळून आला. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी महिलेला मानोरा पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. 
 

Web Title : मां ने 5 साल के बेटे से करवाई चोरी, CCTV से खुला राज

Web Summary : वाशिम में एक महिला ने अपने 5 साल के बेटे का इस्तेमाल कर 44 हजार रुपये की चोरी की। महिला बच्चे को चोरी की ट्रेनिंग देती थी। सीसीटीवी फुटेज से घटना का खुलासा हुआ और महिला गिरफ्तार हुई।

Web Title : Mom used son, 5, to steal 44K; CCTV exposed crime.

Web Summary : A heartless mother in Washim was arrested for using her 5-year-old son to steal ₹44,000 from a shopper in Manora. The woman trained him to pickpocket while she distracted victims. CCTV footage revealed their modus operandi.