तू पुन्हा आलीस? वारंवार होणाऱ्या अपमानाचा घेतला सूड; सुनेने सासर्याला जमिनीवर आपटून संपवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 16:18 IST2026-01-02T16:12:41+5:302026-01-02T16:18:10+5:30
दिल्लीत एका सूनेने तिच्या सासऱ्याची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

तू पुन्हा आलीस? वारंवार होणाऱ्या अपमानाचा घेतला सूड; सुनेने सासर्याला जमिनीवर आपटून संपवलं
Delhi Crime: एका ३२ वर्षीय महिलेने आपल्या ६२ वर्षीय सासर्याची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना दिल्लीतील द्वारका येथील बिंदापूर भागात घडली आहे. मृत व्यक्ती भारतीय हवाई दलातून निवृत्त झालेले इंजिनीअर होते. सुरुवातीला हा वाद मालमत्तेसाठी असल्याचे वाटत असले, तरी पोलिसांनी केलेल्या चौकशीत सुनेने जो खुलासा केला आहे, तो थक्क करणारा आहे.
आरोपी गीता (वय ३२) हिचा पती प्रवीण गेल्या ५ वर्षांपासून हैदराबादमध्ये कामाला आहे. गीता आपल्या ४ वर्षांच्या मुलासह पतीच्या स्वतःच्या घरात राहत होती. ऑगस्टमध्ये सासूच्या निधनानंतर, सासरे नरेश कुमार, त्यांचा मुलगा कपिल आणि मुलीने गीताला बिंदापूर येथील घरी राहायला बोलावले. मात्र हे तिच्यासाठी अपमानाकारक वाटले.
"तू पुन्हा आलीस?" शेजाऱ्यांच्या टोमण्याने गेली वैतागून
गीताने पोलिसांना सांगितले की, तिचे सासरचे लोक तिला बिंदापूरला राहायला बोलवत आणि काही दिवसांतच घर सोडून जायला सांगत. असे ६ ते ७ वेळा घडले. जेव्हा ती पुन्हा बिंदापूरला यायची, तेव्हा शेजारी तिला तू पुन्हा आलीस का? म्हणून हिणवायचे. लोकांच्या नजरेत आपण चेष्टेचा विषय बनलो आहोत, या भावनेने गीता प्रचंड संतापलेली होती. २६ डिसेंबरच्या रात्री सासर्यांनी तिला पुन्हा घर सोडून जाण्यास सांगितले, तेव्हाच तिने त्यांच्या हत्येचा कट रचला.
गच्चीवर घडला थरार
२७ डिसेंबर रोजी नरेश कुमार ऊन घेण्यासाठी गच्चीवर गेले होते. हीच संधी साधून गीता तिथे पोहोचली. तिने सासर्यांना जोरात धक्का देऊन जमिनीवर पाडले, त्यांच्या छातीवर बसली आणि त्यांचे डोके सिमेंटच्या जमिनीवर अनेकवेळा जोरात आपटले. एवढ्यावरच न थांबता तिने सासर्यांचा गळा दाबून त्यांचा जीव घेतला.
विशेष म्हणजे, ही संपूर्ण घटना गीताचा ४ वर्षांचा मुलगा आणि नरेश कुमार यांची १३ वर्षांची मुलगी यांनी प्रत्यक्ष पाहिली. घाबरलेल्या चिमुरड्याने आपल्या आत्याला सांगितले की, "आई आजोबांना मारतेय." जेव्हा ती मुलगी गच्चीवर धावत गेली, तेव्हा तिला गीता सासर्यांवर हल्ला करताना दिसली. तिने आरडाओरडा करून शेजाऱ्यांना मदतीसाठी बोलावले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
पोलिसांनी केली अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिंदापूर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ अंतर्गत गुन्हा दाखल करून गीताला अटक केली आहे. गीताचा पती प्रवीण यानेही तिच्या दाव्याची पुष्टी केली असून, त्याने कबूल केले की सासरच्या घरी तिचा वारंवार अपमान होत असे.