महिलेने उघडले पार्सल, आतमध्ये निघाला मृतदेह; पाठवणाऱ्याने मागितले १ कोटी ३० लाख
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 15:59 IST2024-12-20T15:57:46+5:302024-12-20T15:59:03+5:30
एका पार्सलमध्ये मृतदेह पाठवून महिलेकडे तब्बल १ कोटी ३० लाख रुपये मागण्यात आले. या प्रकरणाचा तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे.

महिलेने उघडले पार्सल, आतमध्ये निघाला मृतदेह; पाठवणाऱ्याने मागितले १ कोटी ३० लाख
रिक्षाने एक मोठं पार्सल आलं. त्यामुळे महिलेने ते उघडून बघितले. बॉक्स उघडल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला. कारण बॉक्समधून मृतदेहच पाठवण्यात आला होता. मृतदेहाबरोबर बॉक्समध्ये एक चिठ्ठी होती. त्यात एक कोटी ३० लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. या प्रकारानंतर महिला आणि तिचे कुटुंबीय हादरले.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यात ही घटना घडली आहे. पार्सलमधून घरी मृतदेह पाठवण्यात आल्याने सगळे कुटुंबीय घाबरले. या प्रकाराची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घरी येऊन पार्सल आणि मृतदेहाची पाहणी केली.
गोदावरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अदनान नईम यांनी सांगितले की, "गुरुवारी रात्री हे पार्सल आले होते. चार जणांच्या कुटुंबीयांना घरी हे पार्सल पाठवण्यात आले. यात मृतदेह आणि एक पत्र ही होते. कुटुंबीयांकडे १ कोटी ३० लाखांची खंडणी मागण्यात आली आहे.
हे पार्सल रुग्णवाहिका किंवा कारने नव्हे तर एका रिक्षातून आणण्यात आले होते. पोलिसांनी या प्रकरणाचा सुरू केला असून, हे पार्सल कोणी आणि कोठून पाठवले, याचा शोध घेत आहेत. आतापर्यंत याच्याशी संबंधित कोणताही पुरावा पोलिसांच्या हाती लागलेला नाही.