खळबळजनक!, बेळगावात दागिन्यासाठी महिलेचा खून, संशयित ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 18:20 IST2025-04-23T18:20:05+5:302025-04-23T18:20:33+5:30
बेळगाव : अपार्टमेंटमध्ये घुसलेल्या चोरट्याने एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याबरोबरच तिचा गळा दाबून खून करून अंगावरील अन्य दागिने लंपास ...

खळबळजनक!, बेळगावात दागिन्यासाठी महिलेचा खून, संशयित ताब्यात
बेळगाव : अपार्टमेंटमध्ये घुसलेल्या चोरट्याने एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याबरोबरच तिचा गळा दाबून खून करून अंगावरील अन्य दागिने लंपास केल्याची खळबळजनक घटना लक्ष्मीनगर, गणेशपूर बेळगाव येथे सोमवारी (दि.२१) रात्री उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
खून झालेल्या महिलेचे नाव अंजना अजित दड्डीकर (वय ५४, रा. लक्ष्मीनगर गणेशपूर) असे आहे. तिचे पती अजित दड्डीकर हे ऑटो रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. लक्ष्मीनगर येथील अपार्टमेंटमध्ये राहणारे हे एकमेव पती-पत्नी होते. रात्री ऑटो रिक्षा घेऊन अजित घरी परतल्यानंतर आपल्या पत्नीवर हल्ला झाल्याचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. प्रसंगावधान राखून घरात जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या अंजना यांना त्यांनी तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेऊन दाखल केले.
मात्र डॉक्टरांनी अंजना यांना मृत घोषित केले. चोरट्याने अंजना यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची कर्णभूषणे, हातातील सोन्याची अंगठी आणि सोन्याच्या बांगड्या हिसकावून तिचा खून केल्याचा दड्डीकर परिवारातील सदस्यांचा आरोप आहे. दरम्यान पोलिसांनी चाकूने वार करून खून केल्यानंतर चोरटा दागिने घेऊन फरारी झाला असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
सदर चोरी व खुनाच्या प्रकाराची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निरंजनाराजे अरस, कॅम्प पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अल्ताफ मुल्ला व अन्य अधिकाऱ्यांनी काल रात्री तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिस अधिकाऱ्यांनी अपार्टमेंटमध्ये चौकशी करण्याबरोबरच संपूर्ण पाहणी केली. यावेळी पोलिस श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांनादेखील पाचारण करण्यात आले होते.
त्यानंतर कॅम्प पोलिस वेगाने तपासाची चक्रे फिरवून एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. दरम्यान अंजना दड्डीकर यांचा खून चोरीच्या उद्देशाने झाला की त्यामध्ये अन्य काही कारण आहे? याचा तपास केला जात आहे. चोरी व खुनाच्या या घटनेमुळे लक्ष्मीनगर गणेशपूर येथे खळबळ उडाली असून याप्रकरणी कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.