इंस्टाग्रामवर ब्लॉक केल्याचा सूड! प्रेयसीने प्रियकराला चाकूने भोकसून संपवलं; रक्ताच्या थारोळ्यात पडला तरुण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 10:49 IST2026-02-04T10:17:15+5:302026-02-04T10:49:49+5:30
छत्तीसगडमध्ये प्रेयसीनेच प्रियकराची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

इंस्टाग्रामवर ब्लॉक केल्याचा सूड! प्रेयसीने प्रियकराला चाकूने भोकसून संपवलं; रक्ताच्या थारोळ्यात पडला तरुण
Crime News: सोशल मीडियावरून सुरू झालेल्या प्रेमकहाणीचा अंत अत्यंत रक्तरंजित झाल्याचा प्रकार समोर आला आहे. छत्तीसगडमधील बिलासपुर येथे एका २२ वर्षीय तरुणीने ब्रेकअप आणि सोशल मीडियावर ब्लॉक केल्याच्या रागातून आपल्याच प्रियकराची चाकूने भोसकून हत्या केली. मृत युवक हा भाजप नेते आणि जिल्हा पंचायत अध्यक्षांचा जवळचा नातेवाईक असल्याने या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेला माहितीनुसार, मृत कामता प्रसाद सूर्यवंशी (२५) हा मूळचा रतनपुरचा रहिवासी असून बिलासपुरमधील शुभम विहार येथील शिक्षक कॉलनीत भाड्याने राहत होता. ६ महिन्यांपूर्वी त्याची ओळख इंस्टाग्रामच्या माध्यमातून रोशनी सूर्यवंशी (२२) हिच्याशी झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले, मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात खटके उडत होते.
मोबाईल पाहण्यावरून वाद आणि रक्तरंजित शेवट
कामताने गेल्या काही दिवसांपासून रोशनीशी बोलणे बंद केले होते आणि तिला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ब्लॉक केले होते. कामताचे दुसऱ्या मुलीशी संबंध असल्याचा संशय रोशनीला होता. ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ च्या सुमारास रोशनी थेट कामताच्या घरी पोहोचली. तिने त्याला मोबाईल दाखवण्यास सांगितले, मात्र त्याने नकार देताच त्यांच्यात जोरदार भांडण झाले. संतापलेल्या रोशनीने सोबत आणलेला चाकू थेट कामताच्या छातीत खुपसला.
आरडाओरडा झाला पण...
घरातून भांडणाचा आवाज आल्यानंतर कामताचा रूम पार्टनर बाहेर आला, तेव्हा कामता रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. आजूबाजूच्या लोकांनी तातडीने त्याला रुग्णालयात नेले, परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. कामता हा भाजप नेते आणि जिल्हा पंचायत अध्यक्ष राजेश सूर्यवंशी यांचा भाचा असल्याची माहिती समोर आली आहे.
आरोपी प्रेयसी गजाआड
घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या रोशनीला स्थानिक नागरिकांनी पकडून पोलिसांकडे सोपवले. पोलिसांनी हत्येसाठी वापरलेला चाकू जप्त केला असून रोशनी सूर्यवंशी हिला अटक करण्यात आली आहे.