"खूप मारलं, उपाशी ठेवलं, गोळ्या देऊन गर्भपात..."; सासरी अमानुष छळ, 'तिने' आयुष्य संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 16:39 IST2025-07-17T16:38:31+5:302025-07-17T16:39:04+5:30

पती आणि सासरच्यांवर जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला.

woman end life after writing suicide note on hand and leg | "खूप मारलं, उपाशी ठेवलं, गोळ्या देऊन गर्भपात..."; सासरी अमानुष छळ, 'तिने' आयुष्य संपवलं

फोटो - nbt

उत्तर प्रदेशातील बागपतमध्ये एका महिलेने तिच्या सासरच्यांवर छळ केल्याचा गंभीर आरोप करत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहित महिलेने हाता-पायांवर सुसाईड नोट लिहिली आणि नंतर तिच्या माहेरी विषप्राशन करून आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये तिने तिच्या पती आणि सासरच्यांवर जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

राठोडा गावातील रहिवासी असलेल्या २८ वर्षीय मनिषाचा २०२३ मध्ये गाजियाबादमधील सिद्धीपूर येथील कुंदनशी लग्न झालं होतं. लग्नाच्या पाच महिन्यांनंतर मनिषाचा सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी छळ सुरू केला. गेल्या वर्षी २०२४ मध्ये मनिषाचे वडील तेजबीर सिंह तिला आपल्या घरी घेऊन आले. मनिषा एक वर्षापासून तिच्या माहेरी राहत होती. तिचा भाऊ विवेक म्हणाला की, तीन दिवसांपूर्वी बहिणीच्या सासरच्या घरून २०-२५ लोक आले होते. घटस्फोटाची चर्चा सुरू होती. यावर मनिषाने हुंड्याचे पैसे परत मिळेपर्यंत ती घटस्फोटाच्या कागदपत्रांवर सही करणार नाही असं सांगितलं होतं.

मनिषा तेव्हापासूनच नैराश्यात होती. मंगळवारी रात्री उशिरा कुटुंबातील सर्व सदस्य झोपले असताना तिने विषप्राशन करून आत्महत्या केली. सकाळी कुटुंब जागे झाल्यावर ती बेडवर मृतावस्थेत पडली होती. आई सुनीता हिने पती तेजबीर सिंहला फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून चौकशी केली असता मनिषाच्या हातावर आणि पायावर सुसाईड नोट लिहिलेली आढळली.

"माझ्या मृत्यूला माझे पती, सासू, सासरे आणि दोन दीर जबाबदार आहेत. ते राठोडा येथे आले, मला आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. माझ्या पतीने मला खूप मारहाण केली आणि मला एका खोलीत बंद करून अनेक दिवस उपाशी ठेवलं. हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्याने मला गोळ्या देऊन गर्भपात करायला लावला. माझ्या कुटुंबातील सदस्यांना गावकऱ्यांसमोर अपमानित करण्यात आलं" असं मनिषाने सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. 

सुसाईड नोटमध्ये मनिषाने तिचा पती, सासू, सासरे आणि दिरावर मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. तिच्या मृत्यूसाठी  सासरच्यांना जबाबदार धरलं आहे. बागपतचे एएसपी एनपी सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासात असं दिसून आलं की मृत महिलेचा तिच्या सासरच्या लोकांशी वाद होता.
 

Web Title: woman end life after writing suicide note on hand and leg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.