दिल्लीच्या जामिया नगरमधील एका घरात महिलेचा मृतदेह आढळला. पोलिसांच्या तपासात समोर आलेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे. महिलेचा मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वी झाल्याचं म्हटलं जात आहे. याच दरम्यान, मृत महिलेचा मुलगा देखील खोलीत उपस्थित होता. तो त्याच फ्लॅटमध्ये राहत असूनही मुलाने त्याच्या आईच्या मृत्यूची माहिती कोणालाही दिली नाही.
घरातून कोणताही आवाज न आल्याने शेजाऱ्यांनी तक्रार केली तेव्हा संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं. घरात प्रवेश केल्यानंतर, परिस्थिती पाहून त्यांना धक्काच बसला. जामिया नगर परिसरातील एका फ्लॅटमधून महिलेचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळून आल्याचं पोलिसांनी सांगितलं.
मुलगा आईच्या मृतदेहाजवळच बसला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे आणि प्रकरणाची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या मुलाला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं आहे. या धक्कादायक घटनेनंतर फ्लॅट सील करण्यात आला आहे.
पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. फ्लॅटमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शेजाऱ्यांकडूनच पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाली. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच महिलेच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल.