ही कसली आई! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी स्वतःच्या ५ महिन्यांच्या लेकीची केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 13:46 IST2025-08-11T13:46:41+5:302025-08-11T13:46:56+5:30
पाच महिन्यांच्या मुलीची हत्या करणाऱ्या महिलेला अटक केली आहे.

ही कसली आई! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी स्वतःच्या ५ महिन्यांच्या लेकीची केली हत्या
त्रिपुरापोलिसांनी सिपाहिजला जिल्ह्यात पाच महिन्यांच्या मुलीची हत्या करणाऱ्या महिलेला अटक केली आहे. अधिकाऱ्यांनी सोमवारी एका वृत्तसंस्थेला याबाबत माहिती दिली. सुरुवातीच्या तपासात असं दिसून आलं आहे की, सुचित्रा देबबर्मा (२८) हिने एका वर्षापासून रिलेशनशिपमध्ये असलेल्या बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी मुलीची हत्या केली होती.
सुचित्राच्या शेजाऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर, सोनामुरा पोलीस स्टेशनचे प्रभारी तापस दास यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथक रविवारी रामपदपारा येथील तिच्या घरी गेलं. तिथे मुलगी बेडवर पडलेली आढळली, तर तिची आई बेपत्ता होती. मुलीला सोनामुरा उपविभागीय रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
सुचित्राला नंतर गावातून अटक करण्यात आली. प्राथमिकदृष्ट्या असं दिसतं की, सुचित्राने तिचा पती अमित देबबर्मा कामासाठी बाहेर गेला असताना तिच्या मुलीची गळा दाबून हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
चौकशीदरम्यान सुचित्राने कबूल केलं की, तिला मुलीला मारायचं होतं आणि ज्याच्याशी तिचे विवाहबाह्य संबंध होते त्या पुरुषासोबत पळून जायचं होतं. सध्या, संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि ज्या व्यक्तीसोबत ती एक वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होती त्याचाही शोध घेतला जात आहे.