गुंतवणुकीवर फायद्याचे आमिष दाखवून १६ जणांची ७ कोटी ४२ लाखांची फसवणूक करणाऱ्या महिलेस अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 16:05 IST2025-11-16T16:04:15+5:302025-11-16T16:05:54+5:30
गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत १६ जणांना ७ कोटी ४२ लाख रुपयांना गंडवणाऱ्या महिलेस मीरारोडच्या काशिगाव पोलिसांनी अटक केली आहे.

गुंतवणुकीवर फायद्याचे आमिष दाखवून १६ जणांची ७ कोटी ४२ लाखांची फसवणूक करणाऱ्या महिलेस अटक
मीरा रोड - गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत १६ जणांना ७ कोटी ४२ लाख रुपयांना गंडवणाऱ्या महिलेस मीरारोडच्या काशिगाव पोलिसांनी अटक केली आहे.
मीरा रोडच्या पूनम सागर कॉम्प्लेक्स मध्ये राहणार शिल्पा मनीष बिर्ला यांनी त्यांचा विनय नगर, जेपी नॉर्थ इम्पेरिया मधील फ्लॅट निशा किशोर खैरे उर्फ निशा अंकुर सवई हिला कंपनी कार्यालयासाठी जानेवारी २०२४ मध्ये भाड्याने दिला होता. आपल्या कंपनीत मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक ग्राहक असून कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास दर महिन्यास नफा दिला जातो. मात्र आपली आर्थिक व्यवहार स्थितीमुळे कर्ज घेऊ शकत नाही असं निशा हिने शिल्पा यांना सांगितलं.
तुमच्या नावे कर्ज घेऊन गुंतवल्यास दर महिना २ लाख व १० टक्के कमिशन देईन तसेच कर्जाचे हप्ते मी भरेन असे निशा हिने सांगितल्या नंतर नफ्याच्या आमिषाला भुलून शिल्पा यांनी तयारी दर्शवली. शिल्पा यांच्या नावे विविध बँक आणि फायनान्स संस्थाकडून १ कोटी ७७ लाख २४ हजार रुपयांचे कर्ज घेऊन त्यातील १ कोटी ५५ लाख ५३ हजार रुपये निशा हिच्या विविध बँक खात्यात दिले.
ऑक्टोबर २०२५ पर्यंत निशा हिने शिल्पा हिला दरमहा १ टक्के आणि बँक हप्ते नियमित दिले. नंतर मात्र परतावा देण्याचे बंद करून रक्कम ज्या व्यवसायामध्ये गुंतवलेली होती त्यात तोटा झाल्यामुळे नफा व बँक हप्ते देणे शक्य नसल्याचे सांगितले. शिल्पासह सुनील पाथरे, अयेश रिकामे, भक्ति मारू, दिनेश चौधरी, कुमार राव, लवेश जाधव, निलेश भाटीवाडा, प्रतीक बने, रॉबिन लुईस, सैफअली शेख, संकेत कडवे, सोहेब महापुळे, स्वानंद दळवी, विक्रांत चॅटर्जी आणि अमांडा फर्नांडिस यांची देखील निशा हिने फसवणूक केल्याचे आढळून आले.
शिल्पा बिर्ला यांच्या फिर्यादीनंतर एकूण १६ जणांची ७ कोटी ४२ लाख रुपयांना फसवणूक केल्याप्रकरणी काशिगाव पोलिसांनी ठेवीदारांचे हितसर संबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करून शनिवारी सायंकाळी निशा खैरे उर्फ निशा सवई हिला अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत आहेत.