बायकोचे टोमणे अन् बेरोजगारीचा राग... चहा देण्यास नकार देताच पतीने तीन मुलांच्या आईला संपवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2026 10:49 IST2026-01-04T10:48:49+5:302026-01-04T10:49:17+5:30
सासरी 'घरजावई' म्हणून राहणाऱ्या एका बेरोजगार तरुणाने केवळ चहा बनवण्यास नकार दिला म्हणून आपल्या पत्नीला संपवले.

AI Generated Image
मध्य प्रदेशातील नरसिंगपूर जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. सासरी 'घरजावई' म्हणून राहणाऱ्या एका बेरोजगार तरुणाने केवळ चहा बनवण्यास नकार दिला म्हणून आपल्या पत्नीची धारदार चाकूने गळा चिरून हत्या केली. पत्नीकडून वारंवार मिळणारे टोमणे आणि बेरोजगारीच्या मानसिक तणावातून हे हत्याकांड घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
नेमकी काय आहे घटना?
आरोपी मनोज सोनी हा बेरोजगार होता आणि कोणतेही काम करत नव्हता. त्यामुळे तो आपल्या सासरी नरसिंगपूरमध्येच पत्नी लता सोनी हिच्यासोबत राहत असे. नवरा काहीच काम करत नसल्याने घर चालवताना लताला अनेक अडचणी येत होत्या, ज्यामुळे त्यांच्यात सतत भांडणे होत असत. लता अनेकदा मनोजला त्याच्या निकम्मेपणावरून टोमणे मारत असे, ज्याचा राग मनोजच्या मनात धुमसत होता.
चहावरून उडाला वादाचा भडका
१० डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळच्या सुमारास मनोजने लताला चहा बनवून देण्यास सांगितले. मात्र, आधीच संतापलेल्या लताने चहा बनवण्यास स्पष्ट नकार दिला. या साध्या नकारामुळे मनोजचा संयम सुटला आणि त्याच्यातील सैतान जागा झाला. त्याने रागाच्या भरात घरातील धारदार चाकू उचलला आणि लताचा गळा चिरला. या हल्ल्यात लताचा जागीच मृत्यू झाला. पत्नीचा जीव घेतल्यावर आरोपी मनोज घटनास्थळावरून पसार झाला होता.
असा लागला आरोपीचा छडा
गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस मनोजच्या मागावर होते. तो सतत आपले लोकेशन बदलत पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर, नरसिंगपूर-करेली हायवेवरील सिद्ध बाबा मंदिराजवळच्या एका शेतात तो लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने या परिसराला वेढा घातला आणि मनोजला बेड्या ठोकल्या.
न्यायालयीन कोठडीत रवानगी
पोलीस चौकशीत मनोजने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. "काम करत नसल्यामुळे ती सतत मला बोलत असायची, त्या दिवशी चहा मागितला तरी तिने दिला नाही म्हणून मी रागाच्या भरात हे पाऊल उचललं," अशी कबुली त्याने दिली. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याची रवानगी आता तुरुंगात करण्यात आली आहे. एका कप चहावरून झालेल्या या वादाने एका महिलेचा बळी घेतला असून तीन मुलांच्या डोक्यावरून आईचे छत्र हरपले आहे.