प्लॉट विकत घ्यायचा, पत्नी हट्टाला पेटली; पतीचा संताप अनावर झाला अन् त्याने तिचा कान कापला! कुठे घडली घटना?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 15:50 IST2025-11-19T15:49:45+5:302025-11-19T15:50:20+5:30
खुशराज मंगळवारी रात्री सुमारे १० वाजता ड्युटीवरून घरी परतला. त्याने पत्नीला ज्यूस पाजण्याच्या बहाण्याने घराबाहेर नेले अन्...

प्लॉट विकत घ्यायचा, पत्नी हट्टाला पेटली; पतीचा संताप अनावर झाला अन् त्याने तिचा कान कापला! कुठे घडली घटना?
स्त्री हट्टापुढे सगळ्यांनाच झुकावे लागते, अशी म्हण आहे. मात्र, पत्नीच्या हट्टामुळे चिडलेल्या पतीने तिच्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना आता समोर आली आहे. राजस्थानच्या कोटा शहरात ही हदारवणारी घटना घडली आहे. या भागात राहणाऱ्या एका पतीने पत्नीवर हल्ला करून तिचे कान कापले. कोटा येथील रंगबाड़ी परिसरात ही घटना घडली आहे.
पत्नीच्या हट्टामुळे पती संतप्त
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती खुशराज (३२) हा पत्नी गिरिजेश हिच्याकडून सतत प्लॉट खरेदीसाठी येत असलेल्या मागणीमुळे संतप्त झाला होता. ही घटना घडवल्यानंतर आरोपी स्वतः महावीर नगर पोलीस ठाण्यात गेला आणि त्याने पोलिसांना याची माहिती दिली.
ज्यूस पाजण्याच्या बहाण्याने नेले अन्...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुशराज मंगळवारी रात्री सुमारे १० वाजता ड्युटीवरून घरी परतला. त्याने पत्नीला ज्यूस पाजण्याच्या बहाण्याने घराबाहेर नेले. पत्नीला वाटले की, पतीला आपल्याशी छान गप्पा मारायच्या आहेत, म्हणून तीही मनात कोणतीही शंका न ठेवता त्याच्यासोबत गेली. पण, आरोपी पती तिला एका निर्जन स्थळी घेऊन गेला. तिथे त्याने आधी तिला मारहाण सुरू केली. त्यानंतर त्याने पत्नीला झाडीच्या दिशेने ढकलले. ती जमिनीवर पडल्यानंतर त्याने चाकूने तिचा एक कान कापला.
दोघांच्या दाव्यात विसंगती
घडलेल्या घटनेनंतर पती खुशराजने पोलीस ठाण्यात जाऊन सांगितले की, त्याची पत्नी प्लॉट खरेदीसाठी सतत दबाव टाकत होती, ज्यामुळे तो मानसिक तणावाखाली होता. या तणावातच त्याने पत्नीवर हल्ला केल्याचे त्याने कबूल केले.
पत्नीचा वेगळाच आरोप
पीडित पत्नी गिरिजेशने मात्र आरोपीचे सर्व दावे फेटाळले आहेत. तिने पोलिसांना सांगितले की, ती गेल्या दोन महिन्यांपासून आजारी होती आणि नुकतीच रुग्णालयातून घरी आली होती. आजारपणामुळे ती आपल्या माहेरी राहत होती. तिच्या म्हणण्यानुसार, पतीने तिला डॉक्टरांना दाखवण्याच्या बहाण्याने मंगळवारी कोटा येथे बोलावले होते. तिचे वडील तिला कोटा येथे सोडून परत गावी गेले होते. गिरिजेशचा आरोप आहे की, त्यांच्यात कोणत्याही प्रकारचा वाद किंवा भांडण नव्हते. पतीने ही संपूर्ण घटना जाणूनबुजून रचलेल्या कटाप्रमाणे घडवून आणली. पतीने तिच्यासोबत सामान्य वर्तन केले, त्यामुळे तो असा हल्ला करेल याचा तिला अजिबात अंदाज नव्हता.
महिला रुग्णालयात दाखल, तपास सुरू
या घटनेची माहिती मिळताच महावीर नगर पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि जखमी महिलेला एमबीएस रुग्णालयात दाखल केले, जिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी सांगितले की, महिलेची प्रकृती सध्या स्थिर आहे आणि डॉक्टर तिच्या कापलेल्या कानावर उपचार करत आहेत. पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे. सुरुवातीच्या चौकशीत पतीने पुन्हा प्लॉटच्या वादाचे कारण दिले असले तरी, पोलीस पीडितेचा जबाब आणि परिस्थितीच्या आधारावर या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. महिलेने केलेल्या आरोपाप्रमाणे ही घटना पूर्वनियोजित होती का, याचाही पोलीस शोध घेत आहेत.