सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 23:18 IST2025-09-28T23:15:29+5:302025-09-28T23:18:49+5:30
जोडप्याला दोन मुली आहेत. त्यांना या गोष्टीचा धक्का बसला आहे.

सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली: चारित्र्याच्या संशयातून आणि कौटुंबिक वादातून पती प्रशांत एडके याने पत्नी काजल (वय २८) हिचा धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची घटना खणभागातील शांतीनगर येथे घडली. सकाळी साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला. खुनानंतर पती प्रशांत याने सांगली शहर पोलिस ठाण्यात हजर होऊन हा प्रकार सांगितला. त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रशांत एडके हा मजुरीचे काम करत होता. त्याचा काजल हिच्याशी काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. दोन मुलींसह शहरातील शांतीनगर परिसरात ते राहत होते. काजल आणि प्रशांत यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू होता. काजल हिच्या चारित्र्याचा प्रशांतला संशय होता. त्यावरून सतत वाद होत होते. दहा दिवसांपूर्वी काजल घरातून निघून गेली होती. त्यामुळे प्रशांतने १६ सप्टेंबर रोजी सांगली शहर पोलिस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची फिर्याद नोंदवली. पोलिसांनी तिचा शोध घेऊन तिला परत आणले होते.
काजल परत आल्यानंतर प्रशांतने तिची समजूत काढली होती. तरीही त्यांच्यात वाद सुरूच होता. काजलने घर सोडून जाणार असल्याचे सांगितले होते. त्यावरून रविवारी सकाळी पुन्हा वाद झाला. सकाळी साडेअकराच्या सुमारास काजल घरातील सर्व कामे आवरून झोपली होती. यावेळी पती प्रशांत घरी आला. त्याने धारदार हत्याराने काजलच्या गळ्यावर चार ते पाच वार केले. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या काजलचा रक्तस्त्राव होऊन जागीच मृत्यू झाला.
पत्नीच्या खुनानंतर प्रशांत याने दोन्ही मुलींना काही अंतरावर राहात असलेल्या आईकडे सोपवले. त्यानंतर घराला बाहेरून कडी लावून तो सांगली शहर पोलिस ठाण्यात हजर झाला. त्याने पत्नीचा खून करून आल्याचे पोलिसांना सांगताच धावपळ उडाली. पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी पथकासह घटनास्थळ गाठले. अतिरिक्त पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर, सहायक पोलिस अधीक्षक विमला एम. यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना केल्या. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. ‘फॉरेन्सिक’ टीमने घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर काजलचा मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला.
चिमुकल्या मुलींना धक्का
काजल आणि प्रशांत यांना दोन मुली आहेत. एका मुलीला हृदयविकाराचा त्रास आहे. आई-वडिलांच्या भांडणामुळे मुली घाबरत होत्या. दहा दिवसापूर्वी काजल घर सोडून गेली होती. परत आल्यानंतर मुलींकडे बघून प्रशांतने सर्व विसरून जाऊन संसार करू, असे सांगितले होते. परंतु, काजलने परत जाणार असल्याचे सांगितल्यामुळे प्रशांतने रागातून खून केला. आईच्या खुनाची माहिती समजताच चिमुकल्या मुलींना मोठा धक्का बसला.