"माझ्या नवऱ्याला मार, नाहीतर मी..."; ५ मुलांच्या आईचा हट्ट, बॉयफ्रेंडपेक्षा १२ वर्षांनी आहे मोठी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 14:43 IST2025-10-15T14:41:31+5:302025-10-15T14:43:39+5:30
वीरपाल नावाच्या शेतकऱ्याची हत्या करण्यात आली.

फोटो - आजतक
उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमधील बिलारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आलेहदादपूर देवा नगला गावात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. वीरपाल नावाच्या शेतकऱ्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणाच्या तपासात वीरपालची पत्नी सुनीता हिने तिचा बॉयफ्रेंड अंशूसोबत मिळून पतीची हत्या करण्याचा कट रचल्याचं उघड झालं. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. आरोपी महिलेला पाच मुलं आहेत आणि ती तिच्या बॉयफ्रेंडपेक्षा १२ वर्षांनी मोठी आहे.
चौकशीदरम्यान सुनीताने कबूल केलं की, तिची आणि अंशूची शेती शेजारी आहे. सुमारे चार महिन्यांपूर्वी भातलावणीच्या वेळी दोघांची भेट झाली आणि त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. सुनीताच्या म्हणण्यानुसार, ती अनेकदा तिचा नवरा वीरपालला दारू पिऊन शेतात पाठवत असे आणि नंतर तिचा बॉयफ्रेंड अंशूला घरी बोलावत असे.
काही दिवसांपूर्वी वीरपालने त्यांना घरी एकत्र पाहिलं. त्याने सुनीताला मारहाण केली. त्यानंतर सुनीताने अंशूला सांगितलं की, जर त्याने तिच्या पतीला मारलं नाही तर ती विष पिऊन आत्महत्या करेल. २ ऑक्टोबर रोजी वीरपालने अंशू आणि सुनीताला एकत्र पाहिलं आणि त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर, दोघांनी वीरपालला संपवण्याचा निर्णय घेतला. १३ ऑक्टोबरच्या रात्री, जेव्हा वीरपाल शेतात गेला तेव्हा अंशू सुनीताच्या सांगण्यावरून आला आणि त्याची गळा दाबून हत्या केली.
सुनीता बॉयफ्रेंडला सांगायची, "तू अजून लग्न केलेले नाहीस, मी आयुष्यभर तुझ्यासोबत राहीन, पण जर माझा पती आपल्या मार्गातून गेला तरच." यामुळे अंशूने हत्या केली. पोलिसांनी कॉल रेकॉर्ड आणि स्थानिक साक्षीदारांच्या जबाबांवरून गुन्ह्याचा उलगडा केला. चौकशीदरम्यान दोघांनीही कबुली दिली. पोलिसांनी सुनीता आणि अंशूविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना जेलमध्ये पाठवलं आहे.