नणंदेच्या नवऱ्याच्या प्रेमात पत्नी झाली आंधळी; सहा मुलांच्या बापाचा काटा काढला! कशी पकडली गेली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 16:11 IST2026-02-03T16:11:10+5:302026-02-03T16:11:43+5:30
नणंदेच्या नवऱ्यासोबत असलेल्या अनैतिक संबंधांमध्ये पती अडसर ठरत असल्याने, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली.

नणंदेच्या नवऱ्याच्या प्रेमात पत्नी झाली आंधळी; सहा मुलांच्या बापाचा काटा काढला! कशी पकडली गेली?
प्रेम आंधळं असतं असं म्हणतात, पण याच प्रेमाच्या नादात एका पत्नीने आपल्या सात जन्माच्या जोडीदाराचा क्रूरपणे बळी घेतल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये उघडकीस आली आहे. आपल्या नणंदेच्या नवऱ्यासोबत असलेल्या अनैतिक संबंधांमध्ये पती अडसर ठरत असल्याने, पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह कालव्यात फेकून दिला. मात्र, पोलिसांच्या चाणाक्ष नजरेतून ही गुन्हेगार पत्नी सुटू शकली नाही.
नेमकं प्रकरण काय?
मुरादाबादच्या भोजपूर पोलीस ठाणे हद्दीतील गोधी गावात अख्तर नावाचा तरुण आपल्या कुटुंबासह राहत होता. गावातच छोटंसं किराणा दुकान चालवून तो आपल्या सहा मुलांचा आणि पत्नीचा उदरनिर्वाह करत होता. मात्र, ३० जानेवारी रोजी अख्तरचा मृतदेह स्थानिक कालव्यात तरंगताना आढळल्याने परिसरात एकच खळबळ माजली. सुरुवातीला ही दुर्घटना असावी असा संशय होता, पण पोलिसांनी जेव्हा तपास चक्र फिरवली तेव्हा समोर आलेलं सत्य ऐकून पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली.
असं उघड झालं पत्नीचं पाप
अख्तरचा मृत्यू झाल्यानंतर त्याची पत्नी शबीना हिने घरात मोठा टाहो फोडला होता. मात्र, पोलिसांना तिच्या वागण्यावर संशय आला. तांत्रिक तपास आणि मोबाईल कॉल्सच्या डिटेलवरून पोलिसांना समजले की, शबीनाचे तिचे नातेवाईक असलेल्या अल्ताफसोबत प्रेमसंबंध होते. यावरून पोलिसांनी शबीनाला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच तिने आपला गुन्हा कबूल केला.
असा रचला हत्येचा कट
शबीना आणि अल्ताफ यांचे सूत जुळले होते, मात्र पती अख्तरला याची कुणकुण लागली होती. यामुळे घरात सतत वाद होत होते. अखेर शबीनाने अल्ताफच्या मदतीने पतीला कायमचं संपवण्याचा निर्णय घेतला. या कटात त्यांनी सतपाल आणि रंजीत नावाच्या दोन साथीदारांनाही सामील करून घेतले. संधी मिळताच या सर्वांनी मिळून अख्तरची गळा दाबून हत्या केली आणि ओळख पटू नये म्हणून मृतदेह कालव्यात फेकून दिला.
पोलीस कारवाई
या प्रकरणी पोलीस अधीक्षक कुंवर आकाश सिंह यांनी माहिती दिली की, "ही एक पूर्वनियोजित हत्या होती. अनैतिक संबंधांतून हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी पत्नी शबीना, तिचा प्रियकर अल्ताफ आणि इतर दोन साथीदारांना अटक केली आहे. सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे."