Video : जेव्हा पोलीस आयुक्त पदावर होते, तेव्हा त्यांनी माझ्यावर आरोप का नाही केले; अनिल देशमुखांनी केला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 20:24 IST2021-06-25T19:57:24+5:302021-06-25T20:24:01+5:30
Anil Deshmukh : तसेच चौकशीत लवकरच दूध का दूध, दूध का पाणी समोर येईल असे पुढे देशमुख म्हणाले.

Video : जेव्हा पोलीस आयुक्त पदावर होते, तेव्हा त्यांनी माझ्यावर आरोप का नाही केले; अनिल देशमुखांनी केला सवाल
मुंबई : माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी आज सकाळी ईडीने छापा टाकत मोठी कारवाई केली . तसेच वरळीतील त्यांच्या सुखदा इमारतीतील निवासस्थानी देखील छापेमारी सुरु होती. या ईडीच्या कारवाईनंतर अनिल देशमुख यांनी सांगितले, आज ईडीचे अधिकारी आले. त्यांना सहकार्य करण्यात आले. परमबीर सिंह यांना आयुक्त पदावरुन हटविल्यानंतर माझ्यावर खोटे आरोप केले, त्यांनी पोलीस आयुक्त पदाच्या खुर्चीवर बसलेले असताना आरोप का केले नाही असा सवाल उपस्थित करत परमबीर सिंग यांची भूमिका संशयास्पद होती असे देखील देशमुख म्हणाले.
'आज ईडीचे अधिकारी आले. त्यांना संपूर्ण सहकार्य करण्यात आले आहे. आणि पुढेही करत राहू. तसेच परमबीर सिंह यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे आहेत. अँटिलीया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात परमबीर यांची संशयास्पद भूमिका स्पष्ट झाल्यानंतर त्यांची बदली करण्यात आली होती. तसेच याप्रकरणात एनआयएने अटक केले सचिन वाझे, रियाझुद्दीन काझी, सुनील माने तसेच अन्य अधिकारी त्यांनाच रिपोर्ट करत होते. यात त्यांचाच हात आहे. त्यामुळे सिंग यांना पदावरुन हटविल्यानंतर माझ्यावर आरोप करण्यात आले. ते आरोप पोलीस आयुक्त पदाच्या खुर्चीवर होते तेव्हा त्यांनी आरोप का केले नाही, असा प्रश्न देशमुख यांनी उपस्थित करत एनआयएच्या तपासात सत्य समोर येईलच असा विश्वास व्यक्त केला. तसेच माझ्याकड़ून केंद्रीय तपास यंत्रणाना पूर्णपणे सहकार्य करण्यात येईल, असे ईडीच्या कारवाईनंतर प्रतिक्रिया देताना, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
ईडीच्या चौकशीनंतर अनिल देशमुखांनी मांडली माध्यमांसमोर बाजू, परमबीर सिंगावर केला आरोप #AnilDeshmukhpic.twitter.com/Gn2hzVchVr
— Lokmat (@MiLOKMAT) June 25, 2021
सक्त वसुली संचालनायलयाने (ईडी) माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी शुक्रवारी सकाळी छापा घातला. सलग साडेनऊ तास चाैकशी केल्यानंतर ईडीने देशमुख यांचे निवासस्थान सोडले. ईडीने महिनाभरात दुसऱ्यांदा नागपुरात धडक दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ईडीचे पथक मुंबईहून गुरूवारी रात्री नागपुरात पोहोचले आणि शुक्रवारी सकाळी ७.४५ वाजता देशमुख यांच्या निवासस्थानी छापा टाकला. ईडीच्या या छापेमारीमागचं एक मोठं कारण आता समोर आलं आहे. मुंबईतील १० बार मालकांनी सलग तीन महिने अनिल देशमुख यांना ४ कोटी रुपये दिले होते, अशी माहिती ईडीला मिळाली आहे. याच संदर्भात अनिल देशमुखांच्या निवासस्थानांवर ईडीनं धाड टाकल्याची माहिती समोर आली आहे.