'ब्लू व्हेल'पेक्षाही भयंकर! ३ बहिणींचा बळी घेणारा 'कोरियन लव्ह' गेम नेमका आहे तरी काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 14:13 IST2026-02-04T14:03:06+5:302026-02-04T14:13:23+5:30
मोबाईल गेमच्या काल्पनिक जगात ३ बहिणींनी स्वतःचा जीव दिल्याची घटना उत्तर प्रदेशात घडली.

'ब्लू व्हेल'पेक्षाही भयंकर! ३ बहिणींचा बळी घेणारा 'कोरियन लव्ह' गेम नेमका आहे तरी काय?
Korean Love Game: गाझियाबादमधील भारत सिटी सोसायटीत तीन अल्पवयीन सख्ख्या बहिणींनी ९ व्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवल्याच्या घटनेने संपूर्ण देश सुन्न झाला आहे. या घटनेच्या मुळाशी कोरियन लव्ह हा अत्यंत धोकादायक ऑनलाइन गेम असल्याचे समोर आले असून, या गेमच्या विळख्याने तीन चिमुकल्यांचा जीव घेतला आहे. मंगळवारी रात्री २ च्या सुमारास या तिघींनी एकमेकींचे हात पकडून बाल्कनीतून खाली उडी घेतली. जमिनीवर पडण्याच्या जोराच्या आवाजाने सोसायटीमधील रहिवाशांना जाग आली, त्यांनी धाव घेतली असता तिघी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या.
"आम्ही कोरियन राजकन्या आहोत"
पोलिसांना घटनास्थळी सापडलेल्या डायरीतून धक्कादायक खुलासे झाले आहेत. या बहिणींनी पत्रात लिहिले की, "सॉरी पापा... आम्ही कोरिया सोडू शकत नाही. कोरिया हेच आमचे जीवन आहे आणि तुम्ही आम्हाला तिथून बाहेर काढू शकत नाही, म्हणूनच आम्ही हे पाऊल उचलत आहोत." तपासात या मुली स्वतःला भारतीय न मानता कोरियन राजकन्या समजू लागल्या होत्या. या गेमच्या त्या इतक् प्रभावाखालीया होत्या की, त्यांनी डायरीमध्ये रडणाऱ्या मुलींचे चित्र काढून आपली व्यथा मांडली होती.
काय आहे हा 'कोरियन लव' गेम?
हा केवळ मनोरंजनाचा खेळ नसून एक टास्क बेस्ड रोमँटिक गेम आहे. यामध्ये खेळाडूला एक कोरियन व्हर्च्युअल पार्टनर निवडायला दिला जातो, जो त्यांच्याशी चॅटिंग करतो आणि त्यांना प्रेमळ मेसेज पाठवतो. ब्लू व्हेल गेमप्रमाणेच यात ५० दिवसांचे ५० टास्क दिले जातात. सुरुवातीला चॅटिंग करणे किंवा फोटो शेअर करणे असे साधे वाटणारे टास्क हळूहळू वैयक्तिक आणि धोकादायक बनत जातात. हा गेम K-Pop आणि K-Drama च्या लोकप्रियतेचा गैरफायदा घेतो, ज्यामुळे मुलांना आपण एका काल्पनिक कोरियन जगात आहोत असा भास होतो.
'ब्लू व्हेल'शी सारखेच फिचर
अनेक तज्ञांनी या गेमची तुलना रशियातील कुख्यात ब्लू व्हेल चॅलेंजशी केली. ज्याप्रमाणे ब्लू व्हेलमध्ये शेवटचा टास्क स्वतःला हानी पोहोचवणे किंवा आत्महत्या करणे हा असायचा, त्याचप्रमाणे कोरियन लवरमधील शेवटचे टास्क खेळाडूला मृत्यूच्या दारात ढकलणारे असल्याचे बोलले जात आहे.
कोरोना काळातील सवय ठरली जीवघेणी
पोलिस तपासात, १६ वर्षांची निशिका, १४ वर्षांची प्राची आणि १२ वर्षांची पाखी या तिघींना २०२० मधील लॉकडाऊन दरम्यान मोबाईल गेमिंगचे व्यसन लागले होते. त्या तिघींचे खाणे, पिणे, झोपणे आणि अगदी शाळेत जाणे हे सर्व एकाच वेळी चालायचे. या एकत्रित राहण्याच्या सवयीमुळेच त्यांनी ९ व्या मजल्यावरून उडी मारतानाही एकमेकींचे हात धरून हे टोकाचे पाऊल उचलले.
पालकांसाठी धोक्याचा इशारा
मुले मोबाईलवर नेमके काय खेळत आहेत आणि कोणत्या काल्पनिक जगात वावरत आहेत, याकडे लक्ष देणे किती गरजेचे आहे. पोलीस आता या गेमच्या सर्व्हरचा शोध घेत आहेत.