'आम्ही काव्याकडे जातोय...'; लेकीच्या विरहाने ग्रासलं, संपूर्ण कुटुंबानं एकत्र आयुष्य संपवलं! वाचून काळजाचं पाणी होईल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 12:28 IST2025-11-24T12:26:54+5:302025-11-24T12:28:30+5:30
'आता आम्हालाही ईश्वर बोलावतोय,' असं म्हणत एका संपूर्ण कुटुंबाने एकत्र आपले आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

'आम्ही काव्याकडे जातोय...'; लेकीच्या विरहाने ग्रासलं, संपूर्ण कुटुंबानं एकत्र आयुष्य संपवलं! वाचून काळजाचं पाणी होईल!
लेकीच्या अकाली मृत्यूचा धक्का आणि त्यातच वाढलेली आर्थिक विवंचना, या दुहेरी संकटातून बाहेर पडता न आल्याने हैदराबादमधील एका कुटुंबाने अत्यंत टोकाचं पाऊल उचललं आहे. 'आता आम्हालाही ईश्वर बोलावतोय,' असं सांगत एका संपूर्ण कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अंबरपेट परिसरातील मल्लिकार्जुन नगर येथे उघडकीस आली आहे. घरातून एक सुसाईड नोट सापडली असून, त्यात त्यांनी हे पाऊल उचलण्यामागचं नेमकं कारण नमूद केलं आहे.
लेकीच्या मृत्यूने कुटुंबाला ग्रासलं!
अंबरपेट येथील मल्लिकार्जुन नगरमध्ये श्रीनिवास, त्यांची पत्नी विजयलक्ष्मी आणि त्यांची १० वर्षांची धाकटी मुलगी श्रव्या राहत होते. मात्र, काही महिन्यांपूर्वी त्यांची मोठी मुलगी काव्या हिचा प्रकृती अस्वास्थ्यामुळे मृत्यू झाला होता. तेव्हापासून हे संपूर्ण कुटुंब शोकमग्न आणि प्रचंड दुःखात होतं. त्यातच श्रीनिवास हे आर्थिक अडचणींचाही सामना करत होते. दुःखाचा डोंगर आणि पैशांची चणचण यामुळे हे कुटुंब पूर्णपणे खचून गेलं होतं.
स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनिवास आणि विजयलक्ष्मी यांनी आत्महत्येपूर्वी काही शेजाऱ्यांशी बोलताना असं म्हटलं होतं की, "आमची मोठी मुलगी आम्हाला सोडून गेली आहे. आता देव आम्हालाही बोलावतोय." त्यांच्या या बोलण्यातून ते जीवनातील सर्व आशा गमावून बसले आहेत, याचा अंदाज येत होता. यानंतर लगेचच त्यांनी हे भयावह पाऊल उचललं.
घरात दोन दिवस शांतता, दरवाजा तोडल्यावर दिसला थरार!
सोमवारपासून श्रीनिवास यांच्या घराचा दरवाजा उघडलाच नाही, तसेच घरातून कुठलाही आवाज येत नव्हता. दोन दिवस कुटुंबातील कोणीही घराबाहेर न आल्याने श्रीनिवास यांच्या काही जवळच्या नातेवाईकांनी काळजीपोटी त्यांच्या घरी धाव घेतली.
त्यांनी घरात डोकावून पाहिले असता, त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. श्रीनिवास हे मुख्य दरवाजाच्या साडीच्या सहाय्याने लटकलेले आढळले, तर त्यांच्या पत्नी विजयलक्ष्मी आणि १० वर्षांची मुलगी श्रव्या हे दोघेही आतल्या खोलीतील खिडकीच्या लोखंडी गजाला साड्यांच्या मदतीने गळफास लावून लटकलेले आढळले.
सुसाईड नोटमध्ये काय?
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. तपास करत असताना पोलिसांना घरात एक सुसाईड नोट मिळाली आहे. या सुसाईड नोटमध्ये श्रीनिवास आणि विजयलक्ष्मी यांनी स्पष्टपणे लिहिले आहे की, 'आम्ही आता आमच्या मोठ्या मुलीकडे जात आहोत.' प्रामुख्याने मुलीचा विरह आणि आर्थिक तंगी या दोन गोष्टींमुळेच संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झालं आहे. सध्या पोलीस या घटनेची कसून चौकशी करत आहेत.