आजकाल ऑनलाइन फसवणुकीचे नवनवीन प्रकार समोर येत आहेत. त्यातच आता उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथून एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे, जिथे एका उच्चशिक्षित व्यक्तीला ऑनलाइन वधू शोधणे महागात पडले. एका पीएचडी स्कॉलरला मॅट्रिमोनिअल साइटवर भेटलेल्या तरुणीने सुमारे ४९ लाख रुपये गंडा घातल्याचे समोर आले आहे.
नवरीच्या शोधात केली मोठी चूक
वैशाली परिसरात राहणारे ४२ वर्षीय अभिषेक चौधरी हे पीएचडी स्कॉलर आहेत. आपल्यासाठी जीवनसाथी शोधण्यासाठी त्यांनी सप्टेंबरमध्ये एका वेबसाइटवर आपली आयडी तयार केली. तिथे त्यांची ओळख एका महिलेशी झाली. सुरुवातीला दोघांमध्ये मैत्रीपूर्ण गप्पा झाल्या. त्या महिलेने आपण दिल्ली-एनसीआर आणि पंजाबमध्ये रिअल इस्टेटचा व्यवसाय करणाऱ्या कुटुंबातील असल्याचे सांगितले. बोलण्यातून अभिषेक चौधरी यांचा विश्वास जिंकल्यावर या महिलेने त्यांना आपल्या जाळ्यात ओढण्यास सुरुवात केली.
'फॉरेक्स ट्रेडिंग'चा मोह आणि ४९ लाखांची लूट
आरोपानुसार, मैत्री घट्ट झाल्यावर या महिलेने अभिषेक यांना फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, महिलेने त्यांना व्हॉट्सअॅपवर एका बनावट ट्रेडिंग प्लॅटफॉर्मची लिंक पाठवली आणि तिथे रजिस्ट्रेशन करण्यास सांगितले. रजिस्ट्रेशनसाठी त्यांना आपले वोटर आयडी अपलोड करायला सांगण्यात आले. सुरुवातीला २५० डॉलर डिपॉझिटची अट असतानाही महिलेच्या सांगण्यावरून अभिषेक यांनी ५०० डॉलर जमा केले.
बनावट नफा पाहून १० वेळा ट्रान्सफर केले पैसे
फसवणुकीचे खरे षडयंत्र येथून सुरू झाले. महिलेने आणि तिच्या साथीदारांनी अभिषेक चौधरी यांना भारतीय रुपयांमध्ये पेमेंट करण्यास राजी केले. हे पैसे नंतर डॉलरमध्ये रूपांतरित झाल्याचे दाखवून त्यांच्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये जमा केले जात होते. अॅपवर दाखवलेला बनावट आणि मोठा नफा पाहून अभिषेक यांना विश्वास बसला. त्यांनी सुमारे १०हून अधिक वेळा ठगांनी सांगितलेल्या बँक खात्यांमध्ये एकूण ४९ लाख रुपये ट्रान्सफर केले.
पैसे काढायला गेले अन्..
अभिषेक चौधरी यांना आपण फसलो आहोत याची जाणीव तेव्हा झाली, जेव्हा त्यांनी कमावलेला नफा आणि आपली मूळ गुंतवणूक काढण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक वेळी पैसे काढण्याचा प्रयत्न केल्यावर, प्लॅटफॉर्मने त्यांना '३० टक्के टॅक्स' भरण्याची मागणी केली. मूळ गुंतवणूक काढण्यासाठीही टॅक्स भरणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. वारंवार प्रयत्न करूनही जेव्हा पैसे मिळाले नाहीत, तेव्हा ही महिला आणि प्लॅटफॉर्म हे मोठे सायबर फसवणुकीचे जाळे आहे हे त्यांच्या लक्षात आले.
सायबर आणि क्राईमचे एडीसीपी पीयूष कुमार सिंह यांनी सांगितले की, या प्रकरणी आयटी ॲक्ट अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आली आहे. ज्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा झाले, त्यांची माहिती बँकांकडून मागवण्यात आली आहे. एडीसीपी सिंह यांनी लोकांना अशा ऑनलाइन साइट्सवर भेटलेल्या अनोळखी लोकांशी आपली खासगी माहिती शेअर न करण्याचे आवाहन केले आहे.