पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 15:49 IST2025-08-13T15:45:15+5:302025-08-13T15:49:56+5:30
सिद्धू मूसेवाला, बाबा सिद्दिकी हत्याकांडात शेख सलीम उर्फ सलीम पिस्तुलच्या नावाचा समावेश

पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
Salim Pistol Arrest : दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने सुरक्षा यंत्रणांच्या सहकार्याने भारतातील सर्वात मोठा अवैध शस्त्र पुरवठादार शेख सलीम उर्फ सलीम पिस्तूल याला नेपाळमधून भारतात आणले. सलीमला ९ ऑगस्टला नेपाळमध्ये अटक करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, त्याला दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाच्या कार्यालयात ठेवण्यात आले आहे. सलीम २०१८ पासून फरार होता. सलीमने भारतातील गुंडांना तुर्की बनावटीचे झिगाना पिस्तूल पुरवले होते. अनेक वर्षे तो पाकिस्तानमधून आधुनिक शस्त्रे तस्करी करून गुंडांना पुरवत होता. २०१८ मध्ये त्याला पहिल्यांदा दिल्ली पोलिसांनी पकडले होते, परंतु जामीन मिळाल्यानंतर तो परदेशात पळून गेला. अखेर आता त्याला मुसक्या बांधून भारतात आणण्यात आले.
ISI अंडरवर्ल्डशी संबंध
मिळालेल्या माहितीनुसार, सलीमचे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नेटवर्कशी खोलवर संबंध होते. सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील एका आरोपीचा तो मार्गदर्शक असल्याचेही मानले जाते. बाबा सिद्दीकी हत्याकांडातही त्याचे नाव समोर आले आहे. त्याने लॉरेन्स बिश्नोई, हाशिम बाबा यांसारख्या कुख्यात गुंडांना शस्त्रे पुरवल्याचेही त्याच्यावर आरोप आहेत.
आठवीत शिक्षण सोडलं, २० लाखांचा दरोडा घातला
फ्री प्रेस जर्नलमधील एका वृत्तानुसार, सलीम पिस्तूलचे खरे घर दिल्लीतील जाफराबाद येथे आहे. आठवीनंतर सलीमने शिक्षण सोडले आणि ड्रायव्हर म्हणून काम करू लागला. २००० मध्ये तो त्याचा साथीदार मुकेश गुप्ता उर्फ काकासह वाहने चोरी करताना पकडला गेला, तेव्हापासून तो गुन्हेगारी करतोय. २०११ मध्ये, सलीमने जाफराबादमध्ये २० लाख रुपयांचा मोठा सशस्त्र दरोडा टाकला. २०१३ मध्ये, त्याला पोलिसांनी पकडले आणि आयपीसीच्या कलम ३९५ आणि ३९७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. कालांतराने, तो गुन्हेगारीच्या जगात मोठा शस्त्रतस्कर बनला. त्यानंतर त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरही ओळख मिळाली. पोलिस तपासात असे दिसून आले की सलीम हा तुर्की बनावटीच्या झिगाना पिस्तूलांच्या तस्करीत सहभागी होता.