वसईमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी एक भयंकर घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या भांडणाचा राग एका चार वर्षांच्या निष्पाप मुलावर काढला. आरोपीने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडत मुलाला जमिनीवर आपटलं आणि बेदम मारहाण केली. या अमानुष कृत्याचा सीसीटीव्ही व्हिडीओ आता समोर आला असून, तो पाहून लोकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात संतापाचं वातावरण आहे.
वसई येथील 'अनुपम हाउसिंग सोसायटी'मध्ये ही खळबळजनक घटना घडली. या ठिकाणी राहणारे अतुल कोंढारे आणि त्याच सोसायटीत राहणारा रिक्षाचालक संदीप पवार यांच्यात काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. हा वाद इतका विकोपाला गेला की आरोपीने बदला घेण्याचं ठरवलं. पण त्याने आपला राग थेट त्या व्यक्तीवर नाही, तर त्याच्या लहान मुलावर काढला.
सोमवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास सोसायटीत नेहमीप्रमाणे मुलं खेळत होती. त्याच वेळी अतुल कोंढारे यांचा चार वर्षांचा मुलगा विघ्नेश खेळता खेळता एका रिक्षात जाऊन बसला. त्या निष्पाप जीवाला कल्पनाही नव्हती की पुढच्याच क्षणी त्याच्यासोबत काय घडणार आहे. तितक्यात आरोपी संदीप पवार तिथे पोहोचला आणि त्याने तिथे खेळणाऱ्या इतर मुलांना पळवून लावलं. त्यानंतर त्याने एकट्या विघ्नेशला टार्गेट केलं.
आरोपीने प्रथम मुलाला पकडून त्याचं डोकं रिक्षाच्या लोखंडी भागावर जोरात आपटलं. एवढ्यावरही त्याचा राग शांत झाला नाही. त्याने मुलाचे पाय पकडून त्याला खाली खेचले आणि नंतर त्याला जमिनीवर जोरात आदळलं. या दरम्यान मुलगा वेदनेने ओरडत होता, पण आरोपीवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. ही संपूर्ण घटना इतकी क्रूर होती की पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा येईल.
आरोपीने मुलाला फरफटत सोसायटीच्या पहिल्या मजल्याच्या पायऱ्यांपर्यंत नेलं आणि तिथेही त्याला मारहाण केली. याच वेळी मुलाची आजी त्याला वाचवण्यासाठी धावली, पण आरोपीने त्यांच्याशीही धक्काबुक्की केली आणि मारहाण केली. आरोपी इतका हिंसक झाला होता की त्याने निष्पाप मुलासह वृद्ध महिलेलाही सोडलं नाही.
या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. व्हिडिओ पाहून लोकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. सोसायटीतील रहिवाशांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सोशल मीडियावरही हे प्रकरण वेगाने व्हायरल होत आहे. एका लहान मुलासोबत कोणी इतके निर्दयी कसे वागू शकते, असा प्रश्न प्रत्येकजण विचारत आहे.
गंभीर जखमी झालेल्या मुलाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांच्या मते, मुलाची प्रकृती अत्यंत नाजूक असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
Web Summary : In Vasai, a man attacked a 4-year-old, slamming his head and dragging him after a dispute with the boy's father. CCTV footage revealed the horrific act, sparking outrage. The child is in critical condition, and the attacker faces severe charges.
Web Summary : वसई में, एक व्यक्ति ने 4 साल के बच्चे पर हमला किया, विवाद के बाद उसका सिर पटका और घसीटा। सीसीटीवी फुटेज से भयावह कृत्य सामने आया, जिससे आक्रोश फैल गया। बच्चा गंभीर हालत में है, और हमलावर पर गंभीर आरोप लगे हैं।