पतीच्या मृत्यूनंतर पत्नीचा चेहराच सगळं सांगून गेला; पुरलेला मृतदेह बाहेर काढला अन् सत्य आलं समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 11:27 IST2025-11-25T11:21:57+5:302025-11-25T11:27:28+5:30
गुजरातमध्ये एका महिलेने तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याची घटना उघड झाली.

पतीच्या मृत्यूनंतर पत्नीचा चेहराच सगळं सांगून गेला; पुरलेला मृतदेह बाहेर काढला अन् सत्य आलं समोर
Gujarat Crime:गुजरातच्या वडोदरा शहरातून प्रेमसंबंधातून घडलेल्या एका थरारक खुनाच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. वडोदरा येथील एका ३२ वर्षीय व्यक्तीची त्याची पत्नी आणि तिच्या प्रियकराने मिळून गळा दाबून हत्या केली. सुरुवातीला हा मृत्यू अपघाती असल्याचे भासवण्यात आले आणि मृतदेह दफन करण्यात आला. मात्र कुटुंबाला संशय आल्याने, त्यांनी मृतदेह दफन केल्यानंतर पाच दिवसांनी बाहेर काढला आणि शवविच्छेदनातून हा खूनच असल्याचे सिद्ध झाले आहे.
इरशाद अब्दुल करीम बंजारा यांचा १८ नोव्हेंबर रोजी संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबियांनी सुरुवातीला हा अपघाती मृ्त्यू समजून दुसऱ्याच दिवशी त्यांना दफन केले. मात्र, दफनविधीनंतर बंजारा यांच्या पत्नीचे वागणे पाहून कुटुंबियांचा संशय बळावला. दुःखद प्रसंगीही पत्नीच्या चेहऱ्यावर कोणतेही दुःख किंवा शोक दिसून येत नव्हता, असे कुटुंबियांनी पोलिसांना सांगितले. यावरूनच कुटुंबियांनी पत्नीवर आणि तिच्या प्रियकरावर हत्येचा गंभीर आरोप केला.
मृत इरशाद अब्दुल करीम बंजारा याचा तळसली परिसरात १८ नोव्हेंबरच्या रात्री मृत्यू झाला. १८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ ते मध्यरात्री १ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. इरशाद यांच्या कुटुंबियांचा आरोप आहे की, त्यांची पत्नी गुलबानूने मुंबईतील तिचा मित्र तोसिफ आणि आणखी एका साथीदाराच्या मदतीने इरशादला झोपेच्या गोळ्या देऊन गुंगी आणली आणि त्यानंतर त्यांचा गळा दाबून खून केला.
पत्नीच्या मोबाइल फोनवरील संशयास्पद कॉलमुळे या हत्येचे भयानक सत्य उघड झाले. कुटुंबियांनी गुलबानूचा मोबाइल फोन तपासला असता, त्यांना धक्कादायक माहिती मिळाली. गुलबानूने एकाच नंबरवर वारंवार कॉल केल्याचे समोर आले. या मोबाइल कॉलमुळे तिचा प्रियकर आणि हत्येतील तिचा सहभाग याबद्दल कुटुंबियांचा संशय अधिकच बळावला. कुटुंबियांनी याबाबत पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करून पोलिसांकडे तपास करण्याची मागणी केली. या गंभीर आरोपांची दखल घेत पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन, पोलिसांनी दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दफन केलेल्या इरशाद यांचा मृतदेह पाच दिवसांनी बाहेर काढला.
मृतदेहाचे खरे कारण शोधण्यासाठी तो गोत्री रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शवविच्छेदनाचे प्राथमिक निष्कर्ष अत्यंत धक्कादायक होते. वैद्यकीय तपासणीत नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यूची शक्यता फेटाळण्यात आली आणि बंजारा यांचा मृत्यू गळा दाबून झाल्याचे स्पष्ट झाले.खून झाल्याचे समोर येताच, पोलिसांनी इरशादची पत्नी, तिचा कथित प्रियकर आणि त्याच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील गुन्ह्याची नेमकी पद्धत आणि सहभागी असलेल्या व्यक्तींचा सखोल तपास पोलीस करत आहेत.