पत्नीवर पतीने उकळते पाणी ओतले; 'या' विकृत घटनेमागे आहे धक्कादायक कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 15:05 IST2021-08-19T15:04:22+5:302021-08-19T15:05:12+5:30
Uttar Pradesh man pours boiling water on wife : या धक्कादायक घटनेत, एका ३२ वर्षीय महिलेने मुलाला जन्म न दिल्याबद्दल तिच्या पतीने तिच्यावर उकळते पाणी ओतले तेव्हा तिच्या अंगाची लाहीलाही झाली.

पत्नीवर पतीने उकळते पाणी ओतले; 'या' विकृत घटनेमागे आहे धक्कादायक कारण
शाहजहांपूर - उत्तरप्रदेशातील शाहजहांपूर येथे एक अतिशय धक्कादायक, निर्दयी घटना उघडकीस आली आहे. येथील एका व्यक्तीने माणुसकीची, क्रूरतेची मर्यादाच ओलांडली. या धक्कादायक घटनेत, एका ३२ वर्षीय महिलेने मुलाला जन्म न दिल्याबद्दल तिच्या पतीने तिच्यावर उकळते पाणी ओतले तेव्हा तिच्या अंगाची लाहीलाही झाली.
ही घटना गेल्या आठवड्यात घडली होती, परंतु पीडित संजूच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर बुधवारी पती सत्यपालविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक (ग्रामीण) संजीव बाजपेयी म्हणाले की, आरोपी फरार असून त्याला लवकरात लवकर अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पीडित महिलेच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार, सत्यपाल तिच्यावर तिच्या पालकांकडून ५० हजार आणण्यासाठी दबाव आणत होता. या जोडप्याने 2013 मध्ये लग्न केले होते आणि त्यांना तीन मुली आहेत. सर्वात लहान मुलीचा जन्म गेल्या वर्षी झाला होता. या महिलेवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलगा होत नसल्याने आरोपी सत्यपालचा पत्नीवर राग होता. महिलेला माहेरहून 50 हजार रुपये आणण्यासाठी दबावही आणत होता. तो पत्नीला नेहमी त्रास द्यायचा, तिला जेवणही दिलं जात नव्हतं.
पीडित महिलेच्या वडिलांनी त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात भादंवि संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर आरोपी फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे. लवकरच त्याला ताब्यात घेतलं जाऊन योग्य ती कारवाई केली जाईल असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.