ई-सिम वापरताय? धोक्याचे आहे; भामट्यांपासून सावध रहा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 06:12 AM2020-07-27T06:12:05+5:302020-07-27T06:13:07+5:30

सायबर विभागाचा इशारा : तपशिलाची चोरी होत असल्याचे उघड

Using e-SIM? Beware of fraudsters | ई-सिम वापरताय? धोक्याचे आहे; भामट्यांपासून सावध रहा

ई-सिम वापरताय? धोक्याचे आहे; भामट्यांपासून सावध रहा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बाजारात सध्या ई-सिम म्हणजेच एम्बेडेड सिम असलेले स्मार्टफोन बाजारात आले आहेत. मात्र सायबर भामट्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत यातही मोबाइल ग्राहकांची आर्थिक फसवणूक करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सायबर विभागाने सावधगिरीचा इशारा दिला आहे. 


या नव्या स्मार्टफोनमध्ये वेगळ्या सिमकार्डची आवश्यकता नसते. तुम्ही फक्त ई-सिम अ‍ॅक्टिव्हेट करून, योग्य शुल्क भरून हवे ते नेटवर्क निवडून हा फोन वापरू शकता. एअरटेलने नुकतेच असे सिम जारी केले. मात्र त्यानंतर काही काळातच फसवणुकीच्या तक्रारी येऊ लागल्या आणि सायबर भामटे कसे काम करत आहेत, ते समोर आले.

सायबर भामटे #१२१ या एअरटेलच्या नंबरवर स्वत:चा ई-मेल आयडी ग्राहकांच्या नावाने अपडेट करतात. ग्राहकाच्या नावाने ई-सिमकार्ड जारी करून घेतात. तसेच क्यूआर कोडचा वापर करून ते ई-सिम सुरू करून घेतात. त्यानंतर त्या ग्राहकाला एक संदेश येतो, त्यात लिंकवर क्लिक केल्यास एक फॉर्म उघडतो.


त्यात तुमची सर्व आर्थिक माहिती जसे की बँक खात्याचा नंबर क्रेडिट/डेबिट कार्ड नंबर, पिन नंबर सर्व विचारले जातात. सायबर भामटे त्यांच्या फोनमधील तुमच्या नावाचे ई-सिम वापरून तुमची सर्व बँक खात्यातील रक्कम ट्रान्सफर करून तुमची फसवणूक करतात. त्यामुळे सतर्क राहण्याचे आवाहन महाराष्ट्र सायबरचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी केले आहे.

बनावट आरोग्य सेतू अ‍ॅप 

भारतीयांचा डाटा चोरण्यासाठी पाकिस्तानी हॅकर्सनी बनावट आरोग्य सेतू अ‍ॅपही बनविले आहे. त्यातून हे अ‍ॅप वापरणाऱ्यांची माहिती चोरण्याचा प्रयत्न होतो आहे.

काय करा आणि करू नका... 
गरज नसल्यास हे ई-सिम अ‍ॅक्टिव्हेट करू नका.  
कोणताही ई-मेल आयडी, तुमचा ई-मेल आयडी म्हणून देऊ नका.
सोशल मीडियावर तुमचा मोबाइल क्रमांक शेअर करू नका.
ई-सिमबाबत फोन आल्यास संबंधित कंपनीच्या ग्राहक सेवा क्रमांकावर संपर्क साधून खातरजमा करून घ्या.
इंटरनेटवरील कोणत्याही फॉर्मवर तुमच्या बँक खात्याची माहिती डेबिट/क्रेडिट कार्ड नंबर, पिन नंबर देऊ नका.  

Web Title: Using e-SIM? Beware of fraudsters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.