लग्नाचे नाटक करून ८ कोटी कमावले; बँक मॅनेजरसह १२ जणांना फसवलं, चौथ्या पतीने शोध लावला पण आधीच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 10:14 IST2025-11-18T09:59:55+5:302025-11-18T10:14:37+5:30
उत्तर प्रदेशात लग्नाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.

लग्नाचे नाटक करून ८ कोटी कमावले; बँक मॅनेजरसह १२ जणांना फसवलं, चौथ्या पतीने शोध लावला पण आधीच...
UP Crime: उत्तर प्रदेश पोलिसांनीउच्च-पदस्थ अधिकाऱ्यांना फसविणाऱ्या एका महिलेला अटक केली आहे. या महिलेने लग्न आणि खोट्या बलात्काराच्या आरोपांच्या जाळ्यात सरकारी अधिकारी, बँक व्यवस्थापआणि पोलीस कर्मचाऱ्यांसह किमान १२ हून अधिक व्यक्तींना अडकवून कोट्यवधी रुपये उकळले. तक्रारीनंतर पोलिसांनी या हाय-प्रोफाइल ब्लॅकमेलर महिलेला अटक केली आहे. दिव्यांशी असं आरोपी महिलेचे नाव आहे.
प्रेम, विश्वास आणि नंतर गुन्हा हेच तिचे हत्यार
पोलिसांच्या तपासानुसार, दिव्यांशीची फसवणूक करण्याची पद्धत अत्यंत थंड डोक्याची होती. आधी ती सरकारी कर्मचारी, बँक अधिकारी, पोलीस अधिकारी यांना आपल्या बोलण्याने आणि व्यक्तिमत्त्वाने प्रभावित करायची. दोघांमध्ये शारिरीक संबंध प्रस्थापित झाल्यावर ती त्यांच्यावर तात्काळ बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करायची. बदनामीच्या आणि नोकरी गमावण्याच्या भीतीने घाबरलेल्या पीडितांकडून ती लाखो रुपयांची रक्कम घेऊन केस मागे घ्यायची. आतापर्यंतच्या रेकॉर्डनुसार, तिने दोन बँक मॅनेजर, दोन पोलिस अधिकारी आणि तीन सरकारी कर्मचाऱ्यांसह अनेकांना फसवलं.
चौथ्या पतीनेच लावला शोध
बुलंदशहर येथील सब-इन्स्पेक्टर आदित्य कुमार लोचव यांच्याशी दिव्यांशीचे फेब्रुवारी २०२४ मध्ये लग्न झाले. लग्नानंतर ती सतत घरातून बाहेर राहायची आणि आदित्यच्या बँक खात्यातून मोठी रक्कम काढून यूपीआयद्वारे इतरांना पाठवायची. लग्नानंतर चार महिन्यांनी आदित्य यांनी तिचा मोबाईल तपासला असता, तिला वेगवेगळ्या खात्यांमध्ये कोट्यवधींचे व्यवहार आढळले. यात मागील पती आणि मेरठच्या पोलीस अधिकाऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्याचेही उघड झाले. या ब्लॅकमेलिंगमुळे आदित्य यांना इतका त्रास झाला की, त्यांनी दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केला.
२५ नोव्हेंबर २०२४ रोजी जेव्हा आदित्य पोलीस आयुक्तांना भेटायला जाणार होते, तेव्हा दिव्यांशीने स्वतः आयुक्तांच्या कार्यालयात धाव घेतली आणि आदित्यवर छळ, पैशांची अफरातफरी आणि अवैध संबंधांचे खोटे आरोप लावले. तसेच १ कोटी रुपयांची मागणी केली. मात्र, आदित्य यांनी जमा केलेल्या पुराव्यांमुळे तिची ही चाल यशस्वी झाली नाही. पोलिसांनी तात्काळ विशेष तपास पथक स्थापन करून तपास सुरू केला. एसआयटीने दिव्यांशीच्या बँक खात्यांची तपासणी केली असता, गेल्या काही वर्षांत कोट्यवधी रुपयांचे व्यवहार आढळले. हे सर्व पैसे फसवणूक आणि खंडणीतून जमा झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
तपासणीत दिव्यांशीच्या ब्लॅकमेलिंग गँगमध्ये काही पोलीस अधिकारी, दोन वकील आणि अन्य महिलांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. तिच्या अटकेनंतरही काही पोलीस कर्मचारी आदित्यवर तडजोडीसाठी दबाव आणत होते. दिव्यांशीने मेरठ येथील पोलीस अधिकारी प्रेमपाल सिंह पुष्कर याच्यापासून आपला खेळ सुरू केला. त्याला फसल्यानंतर, तिने दोन बँक मॅनेजर आशीष राज आणि अमित गुप्ता यांनाही लक्ष्य केले.
सत्य समोर आल्यानंतर दिव्यांशी महिनाभर पोलिसांना गुंगारा देत होती. अखेर पोलिसांनी तिला घरामधून अटक केली आहे. तिच्यावर फसवणूक, खंडणी, बनावट विवाह, खोटी एफआयआर आणि गुन्हेगारी कट रचल्याच्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्य कुमार यांनी न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली असून, या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या उर्वरित लोकांवरही कारवाई करण्याची मागणी केली आहे.