संपत्तीसाठी मालकालाच केले कैद; निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याला ५ वर्षे घरात डांबून संपवले; मुलींचा उरला हाडांचा सांगाडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 15:02 IST2025-12-30T15:01:26+5:302025-12-30T15:02:13+5:30
उत्तर प्रदेशात मालकाच्या संपत्तीसाठी नोकरांनी हादरवणारे कृत्य केल्याचे समोर आलं.

संपत्तीसाठी मालकालाच केले कैद; निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याला ५ वर्षे घरात डांबून संपवले; मुलींचा उरला हाडांचा सांगाडा
UP Crime: उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. ओम प्रकाश सिंग राठोड (वय ७०) या निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याचा उपासमारीने मृत्यू झाला असून, त्यांची २७ वर्षांची मतिमंद मुलगी रश्मी मृत्यूच्या दारात सापडली आहे. या दोघांनाही त्यांच्याच घरात काम करणाऱ्या एका दांपत्याने केवळ संपत्ती आणि बँक बॅलन्स हडपण्यासाठी गेल्या पाच वर्षांपासून कैदेत ठेवले होते.
मदतीसाठी ठेवले अन् 'भक्षक' बनले
ओम प्रकाश राठोड हे २०१५ मध्ये रेल्वेतून निवृत्त झाले होते. २०१६ मध्ये पत्नीच्या निधनानंतर ते आपली मुलगी रश्मीसोबत एका वेगळ्या घरात राहू लागले. ओम प्रकाश यांना स्वयंपाक येत नसल्याने त्यांनी राम प्रकाश कुशवाह आणि त्याची पत्नी राम देवी यांना घरकामासाठी आणि मुलीच्या देखभालीसाठी ठेवले होते. मात्र, याच दांपत्याने हळूहळू संपूर्ण घराचा ताबा घेतला.
मालक तळघरात कैदेत, नोकर वरच्या मजल्यावर ऐशआरामात
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी कुशवाह दाम्पत्याने ओम प्रकाश आणि रश्मी यांना जमिनीच्या खालच्या मजल्यावरील खोलीत कोंडून ठेवले होते, तर स्वतः मात्र वरच्या मजल्यावर ऐशआरामात राहत होते. ओम प्रकाश यांचे भाऊ अमर सिंह यांनी सांगितले की, "जेव्हा कधी आम्ही भावाला भेटायला जायचो, तेव्हा हे दाम्पत्य त्यांना कोणालाही भेटायचे नाही' अशी खोटी कारणे देऊन आम्हाला हाकलून लावत असे."
सोमवारी ओम प्रकाश यांचा मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली. जेव्हा नातेवाईक घरी पोहोचले, तेव्हा तेथील दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. ओम प्रकाश यांचा मृतदेह फक्त कातडी आणि हाडे उरलेल्या अवस्थेत होता. तपासात असे समोर आले की त्यांना कित्येक दिवस अन्न दिले गेले नव्हते. तर २७ वर्षांची रश्मी एका अंधाऱ्या खोलीत नग्न अवस्थेत आणि अत्यंत अशक्त स्थितीत सापडली. एका नातेवाईकाने सांगितले की, "ती २७ वर्षांची तरुण मुलगी भूकेमुळे ८० वर्षांच्या वृद्धेसारखी दिसत होती. शरीरावर मांस शिल्लक नव्हते, केवळ श्वास घेणारा एक हाडांचा सांगाडा उरला होता."
संपत्तीचा हव्यास
हा सर्व छळ केवळ ओम प्रकाश यांची मालमत्ता आणि त्यांच्या बँक खात्यातील पैसे हडपण्यासाठी सुरू होता, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी ओम प्रकाश यांना मृत घोषित केले असून रश्मीवर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी ओम प्रकाश यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, आरोपी घरगुती कामगार दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात असून, पाच वर्षे कोणालाही या अत्याचाराचा पत्ता कसा लागला नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.