मध्यस्थ्याला १ लाख रुपये देऊन लग्न केले; वाटेतच नववधू गाडीतून पळाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 17:43 IST2025-09-07T17:42:46+5:302025-09-07T17:43:08+5:30
UP: सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मध्यस्थ्याला १ लाख रुपये देऊन लग्न केले; वाटेतच नववधू गाडीतून पळाली
UP: आजकाल अनेकजण लग्न जमत नाही म्हणून, पैसे देऊन वधू मिळवतात. अनेकदा अशा प्रकरणांमध्ये मुलाची फसवणूक होते. तुम्हीही अशाप्रकारच्या अनेक बातम्या ऐकल्या असतील. आता अशीच घटना उत्तर प्रदेशातून समोर आली आहे. एका तरुणाने एक लाख रुपये देऊन उत्तराखंडमधील तरुणीशी लग्न केले. आपल्या पत्नीला घेऊन घरी परतत असताना, दिल्ली लखनऊ राष्ट्रीय महामार्गावरुन नववधू पळाली.
सविस्तर माहिती अशी की, उत्तर प्रदेशातील मुंडलाचा रहिवासी असलेल्या भूक सिंह याने मध्यस्थ्याला एक लाख रुपये देऊन उत्तराखंडमधील रुद्रपूर येथील पूजा कौरसोबत कोर्ट मॅरेज केले. तो आपल्या पत्नीसह परत उत्तर प्रदेशाकडे येत होता, यावेळी तरुणी आणि तिच्या सोबत असलेल्या मध्यस्थ महिलेने शौचास जाण्याच्या बहाण्याने गाडी थांबवली अन् पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरुणाच्या मित्रांनी दोघींनाही पकडले.
यादरम्यान, हायवेवर मोठा गोंधळ उडाला. यानंतर तात्काळ पोलिसांना याची माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी पूजा कौर आणि मध्यस्थी मंजू यांना ताब्यात घेतले. सध्या पोलिस पथक दोन्ही महिलांची कसून चौकशी करत आहे. या दोन्ही महिला एका मोठ्या टोळीच्या सदस्य असू शकतात, त्यामुळे पोलिस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.