आधी छेडछाड नंतर अल्पवयीन तरुणीला ट्रेनसमोर फेकले; एक हात, दोन्ही पाय कापले गेले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 19:27 IST2023-10-12T19:26:23+5:302023-10-12T19:27:13+5:30
UP Crime: आरोपी आणि त्याच्या वडिलांना अटक केली असून, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कठोर भूमिका घेण्याचे आदेश दिले आहेत.

आधी छेडछाड नंतर अल्पवयीन तरुणीला ट्रेनसमोर फेकले; एक हात, दोन्ही पाय कापले गेले
UP Girl Legs Hand Cut:उत्तर प्रदेशच्या बरेली शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी सायंकाळी सीबीगंज पोलीस स्टेशन परिसरात छेडछाडीला विरोध करणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला, एका तरुणाने चालत्या ट्रेनसमोर फेकले. या घटनेत तिचा एक हात आणि दोन्ही पाय कापले गेले. पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपी आणि त्याच्या वडिलांना अटक केली आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याप्रकरणी कठोर भूमिका घेतली असून त्यांच्या आदेशानुसार सीबीगंज पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक कुमार कंबोज, प्रकाश प्रभारी उपनिरीक्षक नितीश कुमार शर्मा आणि एक हवालदार (राखीव) आकाशदीप यांना निष्काळजीपणासाठी निलंबित करण्यात आले आहे.
पिता-पुत्राला अटक
एसएसपींनी राधेश्याम यांची सीबीगंजचे नवीन निरीक्षक म्हणून नियुक्ती केली. पदभार स्वीकारल्यानंतर सीबीगंज पोलिस स्टेशनचे नवीन निरीक्षक राधेश्याम यांनी सांगितले की, या घटनेतील मुख्य आरोपी विजय मौर्य आणि त्याचे वडील कृष्णा पाल यांना विविध कलमांतर्गत अटक करण्यात आली आहे. दोघांवर कारवाई सुरू आहे. जखमी विद्यार्थिनीला तातडीने 5 लाख रुपयांची मदत देण्याचे आणि तिच्या उपचारात हलगर्जीपणा न करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
पोलिस एफआयआरनुसार, सीबीगंज पोलिस स्टेशन हद्दीतील 16 वर्षीय मुलगी कोचिंग क्लासवरुन मंगळवारी 4.30 च्या सुमारास घरी येत होती. सायंकाळी तिच्याच गावातील विजय मौर्य तिला भेटला आणि तिचा विनयभंग करू लागला. जीव वाचवण्यासाठी मुलगी रेल्वे पटरीकडे पळाली, यावेळई विजय मौर्याने तिला ट्रेनसमोर ढकलून मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत तिचा एक हात आणि दोन्ही पाय कापले गेले. माहिती मिळताच पोलीस दाखल झाले आणि जखमी तरुणीला रुग्णालयात दाखल केले.