विवाहबाह्य संबंधांचा आणखी एक निष्पाप बळी; पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 15:59 IST2025-03-25T15:59:13+5:302025-03-25T15:59:26+5:30

15 दिवसांपूर्वीच झाले होते प्रगती आणि दिलीपचे लग्न...

UP Crime Another innocent victim of extramarital affair; Wife kills husband with the help of lover | विवाहबाह्य संबंधांचा आणखी एक निष्पाप बळी; पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवले

विवाहबाह्य संबंधांचा आणखी एक निष्पाप बळी; पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवले

UP Crime : गेल्या काही दिवसांपासून अनैतिक संबंधातून पतीची हत्या केल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. अशा घटनांमुळे देशात चिंतेचे वातावरण आहे. ताजी घटना उत्तर प्रदेशातील मैनपुरीतून समोर आली आहे. येथील एका महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीच्या हत्येची सुपारी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, मैनपुरीतील रहिवासी दिलीप यादव आणि औरैयाची रहिवासी असलेल्या प्रगतीचे 15 दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. लग्नाच्या काही दिवसातच तिने प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केली.

गावातील तरुणावर प्रेम
सविस्तर माहिती अशी की, प्रगतीची मोठी बहीण पारुल, हिचा विवाह दिलीपचा मोठा भाऊ संजय, याच्याशी 2019 मध्ये झाला होता. त्यामुळे प्रगती आणि दिलीप एकमेकांना आधीपासून ओळखत होते. घरच्यांची इच्छा होती की, प्रगती आणि दिलीपचे लग्न व्हावे, पण प्रगतीचे गावातील अनुराग यादववर प्रेम होते. जेव्हा घरच्यांना या नात्याची माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी प्रगतीचे 5 मार्च 2025 रोजी लग्न लावून दिले. पण, लग्नानंतरही तिचे अनुरागवरील प्रेम कायम होते. या प्रेमासाठी तिने गुन्हेगारीचा मार्ग निवडला.

दिलीप शेतात जखमी अवस्थेत आढळला
पोलिस अधीक्षक अभिजीत शंकर यांनी सांगितले की, 19 मार्च 2025 रोजी औरैया जिल्ह्यातील सहार पोलिस स्टेशन परिसरात पोलिसांना एक व्यक्ती शेतात गंभीर जखमी अवस्थेत पडल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल केले, मात्र तीन दिवसानंतर 22 मार्च रोजी त्याचा मृत्यू झाला. ही बातमी दिलीपच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचताच शोककळा पसरली. यानंतर दिलीपच्या भावाने सहार पोलिस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. 

सीसीटीव्ही फूटेजमधून खुलासा
पोलिसांनी ‘ऑपरेशन त्रिनेत्र’ अंतर्गत सीसीटीव्ही फुटेज तपासले असता धक्कादायक सत्य समोर आले. काही लोक दिलीपला दुचाकीवर घेऊन जात असल्याचे व्हिडिओत दिसत होते. हा सुगावा पकडत पोलिसांनी माहिती खबऱ्यांना अॅक्टिव्ह केले आणि काही वेळातच रामजी नागरचे नाव समोर आले. 24 मार्च 2025 रोजी पोलिसांनी रामजी नागरला अटक केली. चौकशीत त्याने खुनाची कबुली दिली.

दोन लाखात डील फायनल झाली
हा संपूर्ण कट प्रगती आणि तिचा प्रियकर अनुराग यादव यांनी रचल्याचे रामजी नागरने सांगितले. प्रगती आणि अनुरागने दोन लाख रुपयांची सुपारी दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी रामजी नागर, अनुराग यादव आणि प्रगती यादव या तिघांना अटक केली. मात्र अद्याप तपास संपलेला नाही. या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे, याबाबत पोलिसांना सुगावा लागला असून, शोध सुरू आहे.

मेरठ हत्याकांड
उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात सौरभ हत्याकांडाची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. पत्नी मुस्कानने प्रियकर साहिलच्या मदतीने आधी सौरभचा गळा चिरून खून केला आणि नंतर मृतदेहाचे तुकडे करून सिमेंट असलेल्या ड्रममध्ये भरले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. सध्या या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.

Web Title: UP Crime Another innocent victim of extramarital affair; Wife kills husband with the help of lover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.