सूडाची भावना! पत्नीचे पुतण्याशी संबंध; पतीला समजताच झाडल्या गोळ्या, स्वत:लाही संपवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 17:49 IST2025-11-19T17:48:56+5:302025-11-19T17:49:38+5:30
लालजी आणि त्रिशा दीड महिन्यापासून वेगळे राहत होते. भांडणानंतर त्रिशा तिची मैत्रिणी पूजाच्या घरी राहायला आली होती.

फोटो - आजतक
गुजरातच्या राजकोटमध्ये एका पतीने आपल्या पत्नीवर गोळ्या झाडल्या आणि नंतर स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे, या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लालजी पधियार (४२) यांनी १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ९:४५ वाजता शहरातील नागेश्वर परिसरातील समेद शिखर अपार्टमेंटमध्ये आपली पत्नी त्रिशा पधियार (३९) यांच्यावर त्यांच्या परवानाधारक बंदुकीने गोळीबार केला. लालजी यांचा जागीच मृत्यू झाला, तर मानेवर गोळी लागलेल्या त्रिशा यांचा दोन दिवसांच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला.
कुटुंबीयांची चौकशी केल्यानंतर लालजी आणि त्रिशा दीड महिन्यापासून वेगळे राहत होते. भांडणानंतर त्रिशा तिची मैत्रिणी पूजाच्या घरी राहायला आली होती असं समोर आलं आहे. त्रिशाचे लालजीचा पुतण्या विशालशी प्रेमसंबंध होते. लालजीला हे कळताच, त्रिशा वेगळी राहू लागली. अनेक दिवसांपासून लालजी त्रिशाला सर्वकाही विसरून पुन्हा घरी परतण्याची विनंती करत होता, परंतु त्रिशा तयार नव्हती. यामुळे संतापलेल्या लालजीने त्रिशाला मारून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.
१५ तारखेला सकाळी, जेव्हा त्रिशा योगा क्लासवरून परतली तेव्हा अपार्टमेंट खाली दोघांचं मोठं भांडण झालं. त्यानंतर लालजीने आपली रिव्हॉल्व्हर काढली, त्रिशावर गोळी झाडली आणि नंतर आत्महत्या केली. पोलिसांनी लालजीच्या पुतण्याची चौकशी केली. मात्र विशालने प्रेमसंबंध नसल्याचं म्हटलं आहे. तो फक्त त्यांच्या घरी काही कामानिमित्त जात असल्याची माहिती दिली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.